। अलिबाग ।
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 21 अंगीकृत रुग्णालये आहेत. या अंगीकृत रुग्णालयातून 1 एप्रिल 2020 ते आजपर्यंत एकूण 21 हजार 154 रुग्णांना 34 कोटी 91 लाख 60 हजार 931 रुपयांचा लाभ राज्य शासनाने दिला असल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. वैभव गायकवाड यांनी दिली आहे.
1 एप्रिल 2020 ते आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण 24,595 रुणांनी अर्ज केले होते. त्यासाठी शासनाने एकूण 45 कोटी 69 लाख 75 हजार 245 रुपयांना मंजूरी दिली होती. योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण 24,595 रुग्णांपैकी 21,154 रुग्णांना लाभ मिळाला. गेल्या 9 वर्षात रायगड जिल्ह्यातील 95 हजार 310 गरजूंनी अर्ज केले होते. तर 85 हजार 670 अर्ज पात्र ठरले होते. त्यासाठी 229 कोटी 64 लाख 99 हजार 704 रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 883 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी रुग्णालयांना 181 कोटी 23 लाख 5 हजार 376 रुपये अदा करण्यात आले आहेत.
गरीब, गरजू रुग्णांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली. या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडओलॉजी आदी लाभ मिळतो.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) तसेच फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार मिळू शकतो. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणार्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे.