कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन

चाकरमान्यांना रेल्वेकडून दिलासा

| मुंबई | प्रतिनिधी |

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असताना चाकरमान्यांचे अर्धे लक्ष हे तिकिटांच्या वेटिंग लिस्टवर असते. कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळणं हे खूप कठीण आहे. गणेशभक्तांसाठी रेल्वेने मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी लाखो चाकरमानी कित्येक महिने आधीच रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग करुन ठेवतात. मात्र, कितीही आधी बुकिंग करायचं ठरवलं तरीदेखील वेटिंगवर दाखवतं. सगळ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल असतात. अशावेळी चाकरमान्यांकडे खासगी वाहनांचाच पर्याय उरतो. मात्र, गौरी-गणपतींच्या काळात रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळं कोकणात पोहोचण्यासाठीच 12 ते 14 तास लागतात. अशावेळी रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी व सोयीचा वाटतो. मात्र, बुकिंग फुल्ल असताना नागरिकांचा हिरमोड होतो. त्यासाठीच रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी 300 गणपती स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. मात्र, भारतीय रेल्वेने भक्तांची सुविधा पाहता 342 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version