पनवेल परिसरातून 36 लाखाची रोकड जप्त

निवडणूक भरारी पथकाची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

लोकसभा निवडणुका सुरू आहेत. बहुतांश मतदारसंघात प्रचाराला रंगत देखील चढली आहे. तसेच काही मतदारसंघात निवडणुकीचा पहिला टप्पा देखील पूर्ण झाला आहे. राज्यात आचारसंहिता सुरू आहे. या आचारसहितेमध्ये पनवेल परिसररात निवडणूक भरारी पथकाने दोन दिवसात वाहन तपासणी दरम्यान 36 लाखाची रोकड जप्त केली आहे. या रकमेची अधिक चौकशी केली असता ही रक्कम खासगी असून कोणत्याही राजकीय पक्षाशी सबंधित नसल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. या आचारसंहीतेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नियम अटींचे पालन करून राजकीय पक्षांना निवडणूक प्रचाराची धुरा पार पाडावी लागत आहे. या आचारसंहितेच्या नियमानुसार 50 हजार रू. रोख रकमेपेक्षा जास्त रक्कम बाळगता येत नाही, अन्यथा कारवाई केली जाते. या नियमानुसार 33- मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 188 पनवेल विधानसभा मतदार संघात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षण भरारी पथकांनी दोन दिवसात पनवेल परिसरातून वाहन तपासणी दरम्यान 35 लाख 99 हजार 900 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही रोख रक्कम (दि.22) एप्रिल आणि (दि.24) एप्रिल रोजी जप्त केली आहे. यामध्ये (दि.22) एप्रिल रोजी 23 लाख आणि (दि.24) एप्रिल रोजी 12 लाख 99 हजार 900 रुपये वाहन तपासणी करताना जप्त केली आहे.

स्थिर सर्व्हेक्षण भरारी पथक क्रमांक 3 पनवेलमधील पळस्पे फाटा येथे नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी करत असताना एमएच 43 बीव्हाय 8949 ब्लू रंगाची टाटा नेक्सॉनमध्ये जवळपास 12 लाख 99 हजार 900 रुपयांची रोख रक्कम मिळून आली. या रक्कमेची चौकशी केली असता ही रक्कम कळंबोली स्टील मार्केटमधील एका खासगी स्टील कंपनीची असल्याची माहिती वाहन चालकाने दिली. तसेच (दि.22) एप्रिल रोजी देखील भरारी पथकाला एमएच 06 सिएच 8868 या नंबरच्या वाहनामध्ये 23 लाख रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम व्यक्तिगत असल्याचे वाहन चालकाने सांगितले आहे. हा चालक अलिबाग येथील आहे. रक्कम जप्त करून पुढील तपास सुरू असल्याचे निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले आहे.

Exit mobile version