80 पेक्षा जास्त जण गेली होती वाहून; 1989 च्या महापुरातील मृतांना श्रद्धांजली
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा अंबा नदीला 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला होता. या महापुराला गुरुवारी (दि.24) 36 वर्षे पुर्ण झाली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या महापुरात गतप्राण झालेल्या 80 ग्रामस्थांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणुन बांधण्यात आलेल्या स्मृती स्तंभाला ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
दुर्दैवाचे दशावतार काय असतात आणि एका रात्रीत महाप्रलयाचे तांडव किती भयानक असू शकते याचा प्रत्यय 36 वर्षापूर्वी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावातील ग्रामस्थांनी अनुभवला आहे. या महापुरात अनेकांनी आपली जिव्हाळ्याची माणसे गमावली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. याबाबत दुःखद आठवणी सांगतांना जे.बी. पाटील म्हणाले की, 23 जुलै 1989 23 तारखेला संध्याकाळी मुंबईवरुन बायकोच्या माहेरुन सर्वजन घरी आलो. नदीला तसे पाणी जास्त नव्हते. रात्री अडिच वाजता ऊठुन बघतो तर काय सर्व घरात पाच फुट पाणी. आई, भाची (पाचवीत), मुलगा (अडिच वर्षाचा) आणि बायको सगळे गोंधळुन गेलो. बघता बघता पाणी आठ नऊ फुट वाढले. बायकोचा हात हातातुन निसटाला आणि ती डोळ्यासमोरुन वाहुन गेली, मुलगा आणि मी वाहत जात एका झाडाला अडकलो. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी झाडावरुन काढले. घराकडे धाव घेतली असता आई आणि भाची स्वयंपाक खोलीच्या ओट्याच्या खिडकीला टांगुन राहिल्या म्हणुन वाचल्या. पण कारभारीण मात्र गेली. आणि तीच्या बरोबर पोटातील आठ महिन्यांचे बाळ देखिल गेले. सरकार दरबारी मृतांचा आकडा 80 असला तरी वास्तवात शेकडो लोकांना आपला जिव गमवायला लागला. या पुराचा फटका पाली आणि इतर गावांना देखील बसला होता, असे त्यांनी सांगितिले.
यावेळी तहसीलदार उत्तम कुंभार, जांभुळपाडा सरपंच लिंबाजी शेंडे, पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर, माजी सरपंच रवींद्र खंडागळे, जयवंत बहाडकर, सुनील साठे, माजी सरपंच मिलिंद बहाडकर, माजी सभापती भारती शेळके, जे. बी. पाटील, भास्कर शेळके, रोहित भगत, अतिष खंडागळे, मिलिंद बहाडकर, मिलिंद शिंदे, ग्रामसेवक सचिन केंद्रे, तलाठी केंद्रे आदींसह ग्रामस्थांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.







