| अलिबाग | प्रमोद जाधव |
सर्व राज्याप्रमाणेच रायगडातही कुणबी नोंदीचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत विविध सरकारी विभागांमधील 17 लाख पाने तपासण्यात आली असून त्यात 39 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र यापैकी किती नोंदी या मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाकडून नोंदी शोधण्याचे काम सुरु असून प्राथमिक माहितीनुसार, मराठा कुणबी, कुणबी मराठ्यांच्या पाच हजारच्यावर नोंदी सापडल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात या नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पहात आहेत. तहसीलदार उमाकांत कडनोर सहाय्यक नोडल अधिकारी, तीन नायब तहसीलदार व पाच लिपीक असे दहा जण कार्यरत आहेत. तसेच, तालुका स्तवरावरदेखील कक्ष उभारण्यात आले असून तहसीलदार नोडल अधिकारी आहेत. उपविभागीय अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागासह, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा कारागृह यामधील मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु करण्यात आले आहे. सुमारे 17 लाख पानांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 39 हजार कुणबींचे पुरावे सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा एक टक्का व फक्त कुणबी यांची नोंद साधारणतः 99 टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.
शिक्षण विभागात शोध मोहिम कुणबी दाखले व मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून कामाला लागले आहेत. आतापर्यंत पाच हजारच्यावर कुणबी मराठा व मराठा कुणबीच्या 156 नोंदी सापडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 1967 पूर्वी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदी शोधण्याचे काम गेल्या दहा दिवसांपासून शिक्षकांनी सुरु केले आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी व इतर कुणबी असे कॉलम तयार करण्यात आले आहे. शाळेतील जनरल रजिस्टरमध्ये जी नोंद सापडली आहे, त्या कॉलममध्ये आकडेवारी नावासहीत भरण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत 15 हजार नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये मराठा कुणबी 156, कुणबी मराठा 5 हजार 38, निव्वळ कुणबी 10 हजार 646 व इतर कुणबीमध्ये तिल्लोरे कुणबी व बिलोरी कुणबीच्या 46 नोंदी सापडल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत. इतर कुणबीमध्ये काही ठिकाणी हिंदू कुणबी अशीदेखील नोंद असल्याचे समोर आले आहे.
नोंदी शोधताना तारेवरची कसरत रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये शंभर वर्ष जुनी रजिस्टर्स आहेत. या जनरल रजिस्टरमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी याची नोंद शोधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीर्ण झालेल्या रजिस्टरमधून प्रत्येक पान चाळताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. काही वेळा रजिस्टरमधील पान खराब झाल्याने ते गळून पडण्याचीदेखील भीती अधिक आहे. त्यामुळे नोंदी शोधताना मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. सुट्टी असतानादेखील काही शिक्षक शाळेत जाऊन तीन ते चार तास या नोंदी शोधण्याचे काम करीत आहेत. तर काही शिक्षक पूर्ण दिवस शाळेत बसून नोंदी शोधत आहेत.
नोंदी शोधण्यामध्ये येणार गती सध्या शाळांना सुट्टी आहे. काही शिक्षक गावी गेले आहेत. तर काही शिक्षक जिल्ह्यातच आहेत. जे शिक्षक जिल्ह्यात आहेत, त्यांच्यामार्फत नोंदी शोधल्या जात आहेत. गावी गेलेले शिक्षक आल्यावर कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु झाले आहे. महाड, पनवेल, कर्जत, माणगाव, अलिबाग या ठिकाणी सुरुवात झाली आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना त्वरित दाखले देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. रायगड जिल्ह्यात याची प्रक्रिया सुरु करण्यात यावी.
नरेश सावंत, अध्यक्ष, सकल मराठा समाज, अलिबाग तालुका
नागरिकांचीदेखील घेणार मदत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगवेगळ्या स्तरावर सुरु आहे. वेगवेगळ्या यंत्रणेची मदत घेत असताना आता जिल्ह्यातील नागरिकांचीदेखील मदत पुरावे शोधण्यासाठी घेतली जाणार आहे. त्यासाठी 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबविली जाणार आहे. ज्या नागरिकांकडे काही पुरावे आहेत, ते पुरावे कार्यालयात देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
