नऊ सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्यपदकांची कमाई
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवजयंतीनिमित्त रविवार, (दि.19)अंधेरी-मुंबई येथे ट्रॅडिशनल रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट करीत तिसर्या क्रमांची ट्रॉफीवर आपले नाव कोरले. जय शोतोकान कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदाकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातून दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन विलेपार्लेचे आमदार पराग अलवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरचे संघटनेचे अध्यक्ष आशुतोष पांडे, रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष रामचंद्र कवळे, तसेच सुमित मेस्त्री, राहुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये अलिबागसह मुंबई, पालघर, ठाणे, वसई, कल्याण, डोंबिवली येथून 278 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
श्रमिका श्रीधर पाटील (महाजने) हिने बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग आणि कराटे फाइट्समध्ये तीन सुवर्णपदके पटकावत प्रथम क्रमांक पटकाविला. प्रियाल निलेश तुरे (वावे सराई) दोन सुवर्णपदक व एक कांस्यपदक पटकाविले. प्रियाल ही साडेचार वर्षांची असून, स्पर्धेतील सर्वात लहान विद्यार्थी म्हणून तिला गौरवण्यात आले. साई संजय मोकल (हाशिवरे) कराटे फाइट्स सुवर्णपदक, बेल्ट रेसलिंगमध्ये रौप्य पदक पटकाविले. अमीर रहीम शेख (वायशेत, सायमन कॉलनी) कराटे फाइट्स सुवर्णपदक आणि मास रेसलिंगमध्ये कांस्यपदक, ऋग्वेद प्रकाश पाटील (बहिरोळे) कराटे फाइट्स सुवर्णपदक, राज रहीम शेख (वायशेत) कराटे फाइट्स सुवर्णपदक, प्रयास दीपक पालकर (रामराज) कराटे फाइट्स मास रेसलिंग कांस्यपदक, रियान खादील शेख (जीतनगर) कराटे फाईट रौप्यपदक पटकाविले.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक संतोष कवळे, नवगाव, रोहन गुरव, रामनाथ, जय कवळे, तनया मंचेकर, वेदिका कवळे, सोनू कामी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि नातेवाईकांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.