बोर्लीतील बहुउद्देशिय निवारा केंद्रासाठी चार कोटींचा निधी

आ.जयंत पाटील यांच्या तारांकितावर सरकारची माहिती
| नागपूर | दिलीप जाधव |
कोकणात राष्ट्रीय चक्री वादळ निवारण कार्यक्रमातून 11 बहूउद्देशिय निवारा केंद्र उभारण्यास गत तीन वर्षापूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार रायगड जिल्हयातील दिघी आणि बोरली येथे बहुउद्देशिय निवारा केंद्र उभारण्यास मंजूरी दिली आहे.त्यासाठी बोर्ली येथील केंद्रासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.याबाबतचा तारांकित प्रश्‍न शेकापचे आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.

लेखी उत्तरात शिंदे यांनी असे म्हटले आहे की, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पा अंतर्गत रायगड,रत्नागिरी,सिंधदुर्ग आणि पालघर जिल्हयातील 11 ठिकाणी बहुउद्देशिय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यास आणि त्यासाठी होणार्‍या रूपये 42 ,39 47,818/- इतक्या खर्चास दिनांक 26 जून 2019 शासन आदेशान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत रायगड जिल्हया मध्ये मौजे दिघी आणि मौजे बोरली येथे बहुउद्देशिय चक्री वादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी मौजे दिघी येथील चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यासाठी 19 डिसेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये 4 कोटी 10,64,870.50/– इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार रायगड जिल्हयातील दिघी आणि बोर्ली येथे बहुउद्देशिय निवारा केंद्र उभारण्याची कार्यवाही प्रगती पथावर आहे. अशी माहिती या लेखी उत्तरातून देण्यात आली आहे.

याबाबत जयंत पाटील यांनी दोन चक्री वादळे येऊन गेली. तरी ही निवारण केंद्र उभारलेले नाही. ते त्वरित उभारा अशी जोरदार मागणी केली होती.जिल्हयात विविध नैसर्गिक आपत्ती येत असून त्यामध्ये चक्री वादळ ,पूरग्रस्त ,दरड ग्रस्त ,तसेच रासायनिक कारखान्यांच्या वसाहतीत वायुगळीती मुळे गावे खाली केली जात असल्याने सदरहू रहिवाश्यांसाठी पूर्ण सुविधा असलेल्या निवारा केंद्राची गरज असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

शिंदे यांच्या लेखी उत्तरात रायगड जिल्हयात विविध नैसर्गिक आपत्ती येत आहेत. त्यामध्ये चक्रीवादळ, पूरग्रस्त, दरडग्रस्त तसेच रासायनिक कारखान्यांच्या वसाहतीत वायुगळती इत्यादि चा समावेश असून त्या अनुशंगाने महाड तालुक्यातील 72 गावांमध्ये व पोलादपुर तालुक्यातील 26 गावांमध्ये निवारा शेड बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version