महाराष्ट्रातील ४० ते ४५ टक्के रुग्ण मुंबईत; महापौरांकडून मिनी लॉकडाऊनचा इशारा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईत पूर्ण लॉकडाऊन ऐवजी मिनी लॉकडाऊन करण्याची सध्या चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या दररोजच्या आकडेवारीतील ४० ते ४५ टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये सुमारे पाच हजारांची भर नव्याने पडत आहे. बुधवारी पालिकेने सुमारे ६० हजार चाचण्या केल्या असून यातून २० हजार १८१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. बाधितांपैकी ८५ टक्के म्हणजेच १७ हजार १५४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, तर १ हजार १७० रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील १०६ रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. गुरुवारी दिवसभरात २,८३७ रुग्ण करोनामुक्त झाले. गुरुवारी मुंबईत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर पालिका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या मुंबईत लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version