| मुंबई | प्रतिनिधी |
भारतातील आघाडीची टेनिस-बॉल टी 10 स्पर्धा असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या आणखी एका ब्लॉकबस्टर सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच आयएसपीएलने सीझन 3 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. लीगच्या मोठ्या, चांगल्या आणि आव्हानात्मक सीझनसाठी आठ फ्रँचायझी त्यांचे संघ उभे करण्याच्या तयारीत आहेत. या सीझनमध्ये 101 शहरांमधील 408 खेळाडूंसाठी बोली लावली जाईल. 9
जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान रंगणाऱ्या सीझन 3 चे यजमानपद सुरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियम भूषवेल.
कठीण चाचण्यांनंतर एकूण 400 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये 19 वर्षांखालील 30 खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आठ संघांपैकी प्रत्येक संघ लिलावासाठी विद्यमान सीझन 3 नोंदणीकृत पूलमधून एक खेळाडू निवडेल. ज्यामुळे खेळाडूंची एकूण संख्या 408 एवढी होईल. अंडर-19, पश्चिम विभाग, पूर्व विभाग, मध्य विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. लिलावात प्रत्येक खेळाडू 3 लाखांच्या मूळ किमतीसह सहभागी होईल. या सीझनचा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे बक्षिसाच्या रकमेत झालेली वाढ. जी 1 कोटींवरून 1.5 कोटी करण्यात आली आहे. तर संघातील खेळाडूंची संख्या देखील 16 वरून 18 करण्यात आली आहे. बोली लावणाऱ्यांसाठी यावेळी आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. ते म्हणजे या फ्रँचायझी गूगली पॉवर वापरण्यास सक्षम असतील. ही एक अनोखी व्हेटो यंत्रणा आहे जी उच्चतीव्रतेच्या बोलींमध्ये अचानक 1 लाखांची बोली वाढवते.
गेल्या हंगामातील सहा संघांकडे प्रत्येकी दोन आरटीएम कार्ड असतील, ज्यामुळे ते त्यांच्या सीझन 2च्या खेळाडूंवरील सर्वोच्च बोलीशी जुळवून घेत लिलावा दरम्यान त्यांना पुन्हा मिळवू शकतील. कोणत्याही खेळाडूसाठी फ्रँचायझी मालक कमाल मर्यादेशिवाय बोली लावू शकतात. तसेच आपल्या राखून ठेवलेल्या खेळाडूंसह प्रत्येक संघाने प्रत्येक झोनमधून किमान दोन खेळाडू निवडणे आवश्यक आहे. संघात किमान दोन अंडर-19 खेळाडूंचा समावेश असणे आवश्यक आहे.
प्रत्येक सामन्यात एक अंडर-19 खेळाडू आणि प्रत्येक झोनमधील एक खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, सर्व 18 संघ सदस्यांनी सीझन 3 दरम्यान किमान एक सामना खेळला पाहिजे.आयएसपीएलची कोअर कमिटी मजबूत आहे. सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, मीनल अमोल काळे आणि सूरज सामत या सदस्यांचा त्यांच्या समितीत समावेश आहे. आयएसपीएलच्या कोर कमिटीचे सदस्य सचिन तेंडुलकर म्हणाले आयएसपीएलचा तिसरा सीझन हा भारतातील तळागाळातील क्रिकेटच्या प्रतिभेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. दरवर्षी, देशाच्या विविध भागांमधून नवीन चेहरे आणि असामान्य प्रतिभा आपल्याला अनुभवायला मिळते. हा लिलाव म्हणजे खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.
आयएसपीएलच्या कोर कमिटी सदस्या मीनल अमोल काळे म्हणाल्या या लिलावाची सर्वांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. विशेषत: चाचण्यांदरम्यान समोर आलेली रोमांचक प्रतिभा. लीग जसजशी विस्तारत जाते तसतसे हे खेळाडू घराघरात जाऊन पोहोचतात आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची संधी देखील त्यांना मिळते. बोलीमधील संघर्ष, रोमांचक संघ संयोजन आणि लिलाव झाल्यावर चाहत्यांना अनेक गोष्टींची उत्सुकता असते. देशभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सीझनमध्ये आयएसपीएलने अजूनच उत्सुकता आणली आहे. या सीझनमधील सर्वात प्रतिभावान खेळाडूला (एमव्हीपी) एक नवीन पोर्श 911 दिली जाईल. भारतातील फ्रँचायझी क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. आयएसपीएलची वाढती प्रतिष्ठा त्याच्या विस्तारातूनही समोर येते.
या हंगामात दिल्ली सुपरहीरो (सलमान खान) आणि अहमदाबाद लायन्स (अजय देवगण) हे नवीन संघ सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत गतविजेती माझी मुंबई (अमिताभ बच्चन), टायगर्स ऑफ कोलकाता (सैफ अली खान आणि करीना कपूर खान), श्रीनगर के वीर (अक्षय कुमार), चेन्नई सिंगम्स (सूर्या), बेंगळुरू स्ट्रायकर्स (हृतिक रोशन) आणि फाल्कन रायझर्स हैदराबाद (राम चरण) यांचा समावेश असेल. फ्रँचायझीला एका खेळाडूला कायम ठेवण्याची परवानगी देणारी नवीन रिटेन्शन पॉलिसी लागू झाल्यामुळे, सीझन 3चा लिलाव आणखी धोरणात्मक आणि तीव्र स्पर्धात्मक होण्याची अपेक्षा आहे.







