बिबट्याने बकर्या फस्त केल्याचा संशय
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथील आदिवासी शेतकरी यांच्या जंगलामध्ये चरायला गेलेल्या 41 बकर्या 14 एप्रिल पासून गायब आहेत. बेडीसगावच्या मागे असलेले मोठे जंगल लक्षात घेता हिंस्त्र प्राण्यांनी त्या बकर्या फस्त केल्याचा संशय आहे तर आदिवासी शेतकरी यांनी आपल्या बकर्या चोरीला गेल्या असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात गेली आहे. दरम्यान, बकर्या हरवल्याने स्थानिक आदिवासी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत मधील बेडीसगाव गावातील नऊ आदिवासी पाड्यात आदिवासी लोकांची वस्ती आहे. त्या आदिवासी वाडी मधील सहा शेतकरी यांच्या घरातील बकर्या घरातून जंगलात चरायला सोडण्यात आल्या होत्या. त्यात किसन निरगुडा यांच्या 18, वाळकु पुंजारा यांच्या 13, भानुदास निरगुडा यांच्या चार, नितिन मेंगाळ यांच्या दोन, लखु दरवडा यांच्या तीन आणि सदु निरगुडा यांच्या दोन अशा 41 बकर्या 14 एप्रिल पासून गायब आहेत. नेहमीप्रमाणे 14 एप्रिल रोजी आदिवासी शेतकरी नितीन मेंगाळ यांची आई सकाळी घरातून बकर्या घेऊन जंगलात जात असतात आणि पुन्हा चार वाजता त्या बकर्यांना घेऊन घरी येत असतात. जंगलात बकर्यांना सोडून त्या आदिवासी शेतकरी महिला या 12 वाजता घरी आल्या आणि जेवण उरकून पुन्हा तीन वाजता बकर्या ज्या भागात सोडल्या होत्या, त्या भागात पोहचल्या. मात्र त्या बकर्या नेहमीच्या भागात नसल्याने तीन तास शोध घेऊन घरी परतल्या आणि बकर्या घरी परत येतात काय? याची वाट पाहू लागल्या.
मात्र रात्री उशिरा पर्यंत त्या 41 बकर्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे नितीन मेंगाळ आणि स्थानिक आदिवासी शेतकरी राम निर्गुडा, भानुदास निर्गुडा,किसन निर्गुडा तसेच अन्य ग्रामस्थ हे 15 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा जंगलात गेले, मात्र बकर्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे बेडीसगाव मधील अनेक आदिवासी लोकांनी हरवलेल्या बकर्या यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हरवलेल्या 41 पैकी एकही बकरीचा शोध लागला नाही. तब्बल चार दिवस शोध घेतल्यानंतर आदिवासी शेतकरी नितीन मेंगाळ यांनी 19 एप्रिल रोजी नेरळ पोलीस ठाणे गाठले आणि बकर्या हरवल्याची तक्रार केली. नेरळ पोलीस ठाणे येथे बेडीसगाव येथील आदिवासी शेतकरी यांच्या 30 बकर्या जंगलात गेल्या होत्या आणि तेथून त्या हरवल्या असून कोणी अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबट्याने फस्त केल्या की चोरीला गेल्या?
बेडीसगाव या माथेरानच्या डोंगर रांगेच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्या वन विभागाच्या संरक्षित जंगलात हिंस्त्र प्राण्यांची वस्ती असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे कदाचित त्या बकर्या यांना बिबट्याने फस्त केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे या बकर्या अज्ञात व्यक्तींकडून चोरी केल्या आहेत काय? याबद्दल देखील संशय व्यक्त होत आहे.







