। जम्मू काश्मीर । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान सुरू झाले आहे. यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान झाले आहे. किश्तवाडमध्ये सर्वाधिक 70.03 टक्के मतदान झाले. तर पुलवामामध्ये सर्वात कमी 36.90% मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.किश्तवाडमधील भाजपचे उमेदवार शगुन परिहार यांनी बागवान परिसरात ओळखपत्राशिवाय मतदान केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. विविध राज्यात राहणारे 35 हजारांहून अधिक विस्थापित काश्मिरी पंडितही मतदान करू शकतील. त्यांच्यासाठी दिल्लीत 24 विशेष बूथ बनवण्यात आले आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल 10 वर्षांनी आणि अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. तब्बल साडेतीन दशकांच्या कालावधीत यंदा प्रथमच काश्मीर खोर्यात कोणत्याही भीतीविना प्रचार सभा पार पडल्या. त्यामध्ये जनतेचा उत्साही सहभागही दिसून आला. खोर्यात मुख्यत: नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पक्षांमध्ये लढत आहे. हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसशी आघाडी केली आहे. जम्मूमध्ये काँग्रेस आणि भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. त्याशिवाय मोठ्या संख्येने अपक्ष, अनेक लहान पक्ष, जमात-ए-इस्लामीचे निवडणुकीच्या राजकारणात पुनरागमन, इंजिनीयर रशीद या नेत्याची जामिनावर सुटका आणि त्यांच्या अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या पक्षाची अखेरच्या क्षणी जमातबरोबर झालेली युती हेही घटक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपने काश्मीर खोर्यातील 47 पैकी केवळ 19 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ‘एआयपी’सारखे लहान पक्ष आणि अपक्ष भाजपच्या इशार्यावर काम करत असल्याचा आरोप ‘एनसी’ आणि ‘पीडीपी’ करत आहेत. या 19 मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात आठ ठिकाणी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये काँग्रेसचे प्रत्येकी चार ठिकाणी उमेदवार आहेत, तर एनसीचे जम्मूमध्ये सहा आणि काश्मीरमध्ये 12 उमेदवार आहेत.आज सकाळी सात वाजल्यापासून कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू झाले. सायंकाळी सहा वाजता मतदानाची सांगता होणार आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुसर्या आणि टप्प्यातील मतदान अनुक्रमे 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, 8 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पीके पोले यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत सुरू आहे. ज्या पद्धतीने मतदान सुरू आहे, त्यावरून 60 टक्क्यांहून अधिक मतदान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जम्मू शहरातील मुठ्ठी भागात काश्मिरी स्थलांतरितांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मतदान केंद्रांना अधिकारी भेट देत आहेत. पहिल्या टप्प्यात 24 विधानसभा मतदारसंघांसाठी 3,266 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
90 जागांवर तीन टप्प्यात मतदान
जम्मू-काश्मीरच्या 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 च्या निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक 28 आणि भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते.