| रायगड | प्रतिनिधी |
सध्या हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला असून, पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांच्या मदतीने आता बीच वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल 42 बीच वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, किहीम, आवास, मांडवा, रेवदंडा, मुरूड, काशीद, दिघी सागरी, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर बिच वॉर्डन नेमण्यात आले आहेत. त्यांना जिल्हा सुरक्षा शाखेमार्फत प्रशिक्षण व ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रशिक्षित बीच वॉर्डन हे संबंधित पोलीस ठाण्याच्या नियंत्रणात काम करणार असून, ते दोन शिप्टमध्ये सकाळी 7 ते 11 वाजता आणि सायकांळी 3 ते 7 वाजतामध्ये काम करणार आहेत. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास तत्काळ त्यांना मदत करण्यात येणार आहे. बीच वॉर्डन यांनी आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.
पर्यटकांना भरती-ओहोटीच्या वेळापत्रकबाबत त्यांना सतर्क करणे. समुद्रकिनारी अचानक काही अपघात झाल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देऊन अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरविणेसाठी प्रयत्न करणे. समुद्रकिनारी चालणारे वॉटर स्पोर्ट्स आणि खाद्यविक्रेते यांच्याकडून पर्यटकांसोबत कोणताही गैरप्रकार होत असल्यास पोलीस प्रशासनास अवगत करणे. पर्यटनाकरिता येणाऱ्या महिला व मुलींची छेडछाड होत असेल, तर दक्ष राहून तत्काळ त्यांना मदत करणे. पर्यटकांच्या हरविलेल्या, सापडलेल्या सामानाची दखल घेऊन सदर ठिकाणी ड्युटी असणाऱ्या पोलिसांना माहिती देणे आदी कर्तव्ये बीच वार्डनला बजवावी लागणार आहेत.
अलिबाग पोलीस ठाणे अंतर्गत अलिबाग 6, वरसोली 5, दिघी सागरी अंतर्गत दिवेआगर (रुपनारायण मंदिर), भट्टी विभाग, दिवेआगर किनारा, एमटीडीसी, सावित्री पाखाडी, हनुमान पाखाडी, गोठणेश्वर मंदिर येथे प्रत्येकी एक, मुरूड पोलीस ठाणे अंतर्गत काशीद किनारा 6, मुरूड किनारा 3, मांडवा पोलीस ठाणे अंतर्गत किहीम 3, मांडवा 3, आवास 3, श्रीवर्धन पोलीस ठाणे अंतर्गत जीवना बंदर 1, श्रीवर्धन फेस्टिव्हल किनारा 1, श्रीवर्धन मुख्य किनारा 2, आरवी किनारा 1, हरिहरेश्वर 1 असे एकूण 42 बीच वॉर्डन तैनात केले जाणार आहेत.
