रायगडात एसटीचे 42 कर्मचारी माघारी

एसटीच्या फेर्‍यात झाली वाढ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड विभागातील राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) 42 कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. तसेच कंत्राटी चालक सेवेत घेतल्यामुळे जिल्ह्यातील एसटी बसच्या फेर्‍यांमध्ये देखील वाढ झाली आहे. बुधवारी 900 फेर्‍या पुर्ण झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देत पुढील 10 दिवसांत कामावर हजर न झाल्यास कर्मचार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील बडतर्फ, निलंबित आणि सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी यांनी नमते घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रायगड विभागातील कर्मचारी सेवेत हजर राहण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत विभागात 42 कर्मचारी पुन्हा हजर झाले आहेत. चार महिन्याएवढा प्रदीर्घ खंड सेवेत पडला असल्याने त्यांना दोन तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन पुन्हा सेवेत रुजू करुन घेतले जाणार आहे. अलिबाग आणि मुरुड आगार वगळता विभागातील पेण आणि माणगाव हे दोन डेपोच पुर्ण क्षमतेने सुरु आहेत. तर रोहा, महाड, कर्जत आणि श्रीवर्धन हे चार डेपो देखील चांगल्या प्रतिसादाने सुरु आहेत. अलिबाग आणि मुरुड डेपोत कमी प्रतिसाद लाभत असला तरी या डेपोच्या देखील समाधानकारक फेर्‍या सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता मोठया संख्येने कर्मचारी सेवेत हजर होतील आणि फेर्‍या वाढून पुन्हा एसटी रस्त्यावर सुसाट धावेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. आजपर्यंत 150 हुन अधिक शेडयूल करण्यात आले असून 900 फेर्‍या पुर्ण झाल्या आहेत. 43 हजार किलोमीटर एसटीने पुर्ण केले असल्याची माहिती देण्यात आली.
अलिबाग आगारात एकुण 288 कर्मचार्‍यांपैकी 104 कर्मचारी बडतर्फ, 15 जणांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. 104 बडतर्फ कर्मचार्‍यांपैकी 11 कर्मचारी दोन दिवसात हजर झाले आहेत. तर 15 सेवा समाप्ती पैकी एकजण हजर झाला आहे. एकुण 64 कर्मचारी हजर झाले असून 93 गैरहजर असल्याची माहिती डेपो मॅनेजर अजय वनारसे यांनी सांगितले. चालकांच्या तुलनेत वाहकांची संख्या कमी असल्याने विनावाहक फेर्‍या सुरु असून ग्रामीण भागात एसटी सेवा सुरु करणे अडचणीचे झाल्याचे त्यांनी सांगितले. तर 5 कंत्राटी चालक आणि 5 विभागीय कार्यालयातून तात्परते चालक देण्यात आले आहेत. त्यामुळे 14 गाडया सुरु असून, 72 फेर्‍यांनी 4 हजार 600 किलोमीटर अंतरावर धावल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version