। दापोली । प्रतिनिधी ।
दापोली, मंडणगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अनिल परब, शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील वादामुळे या निवडणुका कधी नव्हे त्या यावर्षी चर्चेत आहेत. गेल्या दहा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्याने त्याचे राजकीय पडसाद दोन्ही तालुक्यातील राजकीय पटलावर उमटत आहेत.
मंडणगड नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी तब्बल 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले आजमावत आहेत. नगर पंचायतीच्या 13 प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी व सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार मंडणगड शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असून मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
दापोली नगरपंचायतीसाठी 13 जागांसाठी होणार्या निवडणुकीत 43 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण 11 हजार 848 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दापोलीत 15 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या केंद्रांवर 105 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 कर्मचारी राखीव ठेवले आहेत. 3 अधिकार्यांची झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.