‘आषाढी’साठी रायगडातून 47 एसटी

। रायगड । प्रतिनिधी ।

आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणार्‍या भाविक- प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर आहे. यात्राकाळात राज्यभरातून 5 हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमधून तब्बल 47 एसटी गाड्यांची बुकिंग होऊन या एसटी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व एसटी चंद्रभागा एसटी स्थानकामध्ये थांबणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद देत तब्बल 47 गाड्यांची बुकिंग करीत थेट गावातूनच पंढरीच्या वारीला जाण्यासाठीचा योग्य जुळवून आणला आहे.अर्थात, या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

चार तात्पूर्ती बसस्थानके
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदा बस चिखलात अडकणार नाही
यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे यंदा बस चिखलात अडकून पडणार नाहीत, याची काळजी घेत बसेसची पार्किंग केली जाणार आहे. एसटीमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेषत: दक्षता घेतली जाणार आहे.जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
Exit mobile version