। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि.5) 48 पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना 1 लाखांची मदत, शिक्षण, शेतकर्यांना एमएसपीची हमी यासह 30 लाख नोकर्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारित प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी-गरीब, वाय- युवा, ए-अन्नदाता, एन – नारी, अशी काँग्रेसची संकल्पना आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात मजुरी वाढवून दररोज 400 रुपये करणे, गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणे, एमएसपीसाठी कायदा करणे आणि जात जनगणना करणे यांचा उल्लेख आहे. तरुण, महिला, मजूर आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व विभागांसाठी विविध प्रकारच्या योजनांचे आश्वासन देण्यात आले आहे.आपला जाहीरनामा वर्क, वेल्थ आणि वेलफेअर यावर आधारित असल्याचे पक्षाने म्हटले आहे. येथे वर्क म्हणजे रोजगार, वेल्थ म्हणजे उत्पन्न आणि वेलफेअर म्हणजे सरकारी योजनांचा लाभ देणे आहे.
काँग्रेसच्या 4 मोठ्या घोषणा… वन नेशन वन इलेक्शनला विरोध केला असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेळेवरच होतील. मतदान ईव्हीएमद्वारे केले जाईल, परंतु व्हीव्हीपीएटी स्लिप जुळवली जाईल. 10 व्या शेड्युलमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन, याअंतर्गत पक्षांतर झाल्यावर विधानसभा किंवा संसदेचे सदस्यत्व आपोआप रद्द होईल. पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा कायद्यानुसार काटेकोरपणे काम करतील. प्रत्येक प्रकरण संसद किंवा राज्य विधानमंडळांच्या देखरेखीखाली आणले जाईल.