कृषी खात्याचा स्तुत्य उपक्रम
| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाळा संपताच तालुक्यातील ग्रामीण भागात कृषी विभागाच्या पुढाकारातून वनराई बंधारे बांधले जात असतात. या माध्यमातून शेतकरी वर्गास रब्बी व उन्हाळ्यात भाजीपाला लागवडीस पाणी मोठ्या प्रमाणात मिळते. खालापूर तालुक्यात 49 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
खालापूर तालुक्यातील चावणी, खरीवली, परखंदे, नडोदे, जांबरूंग, वडगाव, इसांबे, माडप, लोधीवली, वयाल, चौक, पनशील, बोरगाव, केलवली या गावामध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले. यावेळी पाणी साठविण्याचे महत्त्व लोकांना सांगण्यात आले. पावसाळा संपताच जलाशय आपली पाठ फिरवत असतात. मात्र वनराई बंधारा बांधल्याने काही प्रमाणात हे पाणी येथे जमा होत असल्याने पाण्याचा उपयोग गुरेढोरे, जंगलातील प्राणी, वन्यजीवांना होत असतो.
पाण्याची पातळी वाढावी म्हणून सिमेंटच्या गोणीत माती भरून एकावर एक रचून वाहते पाणी अडविण्यात आले. काही दिवस येथे पाणी असेच राहात असल्याने निश्चितच या पाण्याचा सदुपयोग होणार आहे. त्याचबरोबर भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असे मत मंडळ कृषी अधिकारी, खालापूर जे.के. देशमुख, कृषी पर्यवेक्षक चौक नितीन महाडिक, कृषी पर्यवेक्षक, खालापूर एस.टी. धुमाळ, कृषी सहाय्यक, चौक शिवाजी राठोड, कृषी सहाय्यक, मोहपाडा चेतन चौधरी, कृषी सहाय्यक, वावर्ले, अजित फराटे, कृषी सहाय्यक, वावोशी निलेश पाटील, कृषी सहाय्यक, गोरठण रावसाहेब आंधळे, कृषी सहाय्यक खालापूर नितीन रांजून, कृषी अधिकारी व वनराई बांधण्यार्या तरुणांनी व्यक्त केले.