पंधरा महिन्यात वाढले 49 हजार मतदार

| अलिबाग | वार्ताहर |

गतवर्षी जानेवारीपासून राबवलेल्या मतदान नोंदणी अभियानास रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून मतदारांची संख्या वाढली आहे. (दि.9) एप्रिलअखेर जिल्ह्यात एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार नोंदणी झाली आहे. (दि.23) जानेवारीपर्यंत जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार होते. गेल्या 15 महिन्यांत त्यात 49 हजार 543 इतकी वाढ झाली आहे.

मतदार वाढीसाठी जिल्हा प्रशासनाने गावोगावी मतदान जागृती, प्रचार-प्रसारावर भर दिला आहे. त्याचबरोबर राजकीय पक्ष, नेतेमंडळींनी पुढाकार घेत मतदार यादीतील नावांची पडताळणी, नव मतदारांच्या नाव नोंदणी करून घेतली. गावागावांत पथनाट्य, मतदान मार्गदर्शन व्हॅन पाठवून, तर काही ठिकाणी दवंडी पिटून जनजागृती करण्यात येत आहे. याला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात (दि.9) एप्रिल अखेर एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून पुरुषांची संख्या आठ लाख 20 हजार 605 तर महिला मतदारांची आठ लाख 47 हजार 763, तृतीयपंथी चार मतदार आहेत. तर मतदारसंघात 14 हजार 437 वाढ झाली आहे.

पोलिस प्रशासनाची सज्ज
जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक कंपनी अलिबाग येथे दाखल झाली आहे. गुन्हेगारांविरोधात पोलिस विभागाने अजामीनपात्र, फरार, वॉन्टेड व्यक्तींविरोधात मोहीम राबवली आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या 239 पैकी 216 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. निवडणूक घोषित झाल्यानंतर मतदारसंघात प्रतिबंधात्मक कारवाई करत 12 लाख 75 हजार रुपये किमतीची अवैध दारू व 60 लाख 18 हजार रुपये बेहिशोबी रोख रक्कम विविध कारवाईमध्ये जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
Exit mobile version