| जळगाव | वृत्तसंस्था |
औद्योगिक वसाहतीतील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची शरीरसुखासाठी एका महिलेशी ओळख करून देत त्या व्यावसायिकाकडून वेळोवेळी पैसे उकळून चक्क पाच लाखांची खंडणी घेताना एका वकिलासह त्याच्या मैत्रिणीला एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
औद्योगिक वसाहतीत 55 वर्षीय गृहस्थ ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांचे ओळखीचे वकील ॲड. उखा राठोड (30) रा. रामदेववाडी यांच्या माध्यमातून एका महिलेशी ओळख झाली . त्यानंतर व्यावसायिकाने महिलेच्या संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याच्या मोबदल्यात महिलेला वेळोवेळी पैसेही दिले. सोबतच महिलेने दरवेळी व्यावसायिकाला काहीना काही कारणासाठी फोन करून पैशांची मागणी केली. त्यानुसार व्यावसायिकाने आतापर्यंत 71 हजार 500 आणि महिलेची ओळख करून देणारा वकील उखा राठोड याला 15 हजार रुपये दिले. गुन्हा दाखल करण्याची धमकीवारंवार महिलेकडून होणारी पैशांची मागणी पूर्ण करणे अशक्य असल्याने तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. मला पैसे दिले नाहीत, तर तुझ्याविरुद्ध मुलीवर अत्याचार केल्याची पोलिसांत तक्रार देईन. गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल, तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. त्यानुसार पाच लाख देण्याचेही ठरले. मात्र, तक्रारदाराने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली. सहाय्यक निरीक्षक माधुरी बोरसे यांच्यासह सरकारी पंचांना घेऊन सापळा रचण्यात आला. अयोध्यानगरातील एका फर्निचर दुकानावर तक्रारदार आले. ॲड. उखा राठोड याच्या दुचाकीवर संबंधित महिला पोहोचली. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताच हातरुमाल जमिनीवर टाकायचा होता. तो त्यांनी टाकला. तक्रादाराने एक लाख रुपये रोख आणि चार लाखांचा धनादेश सोपविल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी झडप घालून दोघांना अटक केली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक माधुरी बोरसे तपास करीत आहेत.