पाल्हे पुलावर जीवघेणा ताण!

बंदी आदेश झुगारून 50 टन खडीचा ट्रक; प्रशासन झोपेत?
रेवदंडा बायपासवर संताप, आंदोलनाचा इशारा

| रेवदंडा | महेंद्र खैरे |

अलिबाग-मुरुड मार्गावर जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतुकीस स्पष्ट बंदी घातलेली असतानाही नागाव-पाल्हे पुलावरून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतूक सुरू आहे. पाल्हे पुलावरुन 50 टन खडीचा रॉयल्टी न भरलेला ट्रक राजरोसपणे रेवदंडा बायपासवरील बांधकामस्थळी पोहोचल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अलिबाग तालुक्यातील नागाव-पाल्हे पुलावर अवजड वाहतुकीस बंदी असतानाही नवी मुंबईहून आलेला तब्बल 50 टन खडीने भरलेला, शिवाय रॉयल्टी न भरलेला मालवाहू ट्रक रेवदंडा बायपासमार्गे थेट अशोका बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठिकाणी दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.11) उघडकीस आला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विशेष म्हणजे, सध्या अलिबाग ते सहाण बायपास रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक नियंत्रणासाठी विशेष दक्षता अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात बंदी असलेल्या मार्गावरून अवजड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. “बंदी असताना हा ट्रक पुलावरून गेला तरी कसा?” आणि “संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती?” असे संतप्त सवाल नागरिक आणि स्थानिक वाहतूकदारांकडून उपस्थित होत आहेत.

रेवदंडा-साळाव पुलाच्या बांधकामासाठी अशोका बिल्डकॉन कंपनीकडे काम देण्यात आले असून, स्थानिक श्रीसमर्थ वाहतूक संघटनेने सुरुवातीपासूनच स्थानिक ट्रकधारकांना प्राधान्य देण्याची मागणी केली होती. मात्र, या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत बाहेरील ट्रकद्वारे साहित्य पुरवठा सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

दरम्यान, संबंधित ट्रक चालकाकडून खडी मालावर आवश्यक रॉयल्टी भरलेली नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवरही संशयाची छाया निर्माण झाली आहे. “रॉयल्टी न भरता एवढ्या मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत असेल, तर महसूल यंत्रणा झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घटनास्थळी श्रीसमर्थ वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मोहन पराड, उपाध्यक्ष संकेत भाटकर, सल्लागार अशोक गुरव यांच्यासह सदस्यांनी जोरदार आक्षेप नोंदवत प्रशासन आणि संबंधित कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक ट्रकधारकांना काम न देता बाहेरील वाहनांना संधी देणे, तसेच केलेल्या कामांची बिले मुद्दाम अडवून ठेवण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या सर्व प्रकारामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, नियम फक्त स्थानिकांसाठीच का? आणि बाहेरील वाहनांना मोकळीक का? असा संतप्त प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कोणाचा आशीर्वाद?
बंदी असलेल्या पुलावरून अवजड वाहतूक सुरू राहणे, रॉयल्टी न भरता मालाची वाहतूक होणे आणि प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न होणे, या सर्व प्रकारांमुळे “हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीसमर्थ वाहतूक संघटनेने दिला आहे.

आरटीओला सांगून ट्रकवर तात्काळ कारवाई केली जाईल. यापुढे जर कोणी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पाल्हे बायपासच्या एन्ट्रीलाच सूचना फलक लावण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले आहे.

– सरिता चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा

स्थानिक ट्रकधारकांना काम न देता बाहेरून साहित्य पुरवठा करण्यात येत आहे. त्याला आमचा विरोध आहे. अलिबाग-मुरुडला जोडणारा पाल्हे पूल हा सध्या तरी एकमेव दुवा आहे. त्यामुळे स्थानिकांना कायद्याचा धाक दाखवून गाड्या बंद करण्यात आल्या, मग बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई का होत नाही?

– संकेत भाटकर, उपाध्यक्ष, श्रीसमर्थ वाहतूक संघटना

Exit mobile version