500 एकर शेती संकटात

एमआयडीसीच्या मग्रुरीकडे सरकारचे दुर्लक्ष

। रायगड । आविष्कार देसाई |

अलिबाग तालुक्यातील धेरंड-शहापूर गावातील संरक्षक बंधारे पुन्हा तुटले आहेत. भरतीच्या उधाणाचे पाणी हे शेतात घुसून तब्बल 500 एकर क्षेत्रात खारे पाणी घुसले आहे. पिकती शेती, मत्स्य तलाव पाण्या खाली गेल्याने शेतकर्‍यांचे सुमारे तीन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या काही वर्षापासून एमआयडीसीच्या मग्रुरीकडे सरकार आणि जिल्हा प्रशासन कानाडोळा करत असल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या विरोधात श्रमिक मुक्ती दल लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

धेरंड-शहापूरमधील 387 हेक्टर जमीनीचे संपादन एमआयडीसीने केले आहे. 2007 सालापासून तेथे ना कोणता उद्योग उभा राहीला, ना कोणाला रोजगार मिळाला. एमआयडीसी फक्त जमीन उराशी कवटाळून बसली आहे. उपजिवीकेसाठी यातून मार्ग काढण्यासाठी काही शेतकरी हे शेती, मत्स्य शेती करत आहेत. या सर्व जमीनी भरती रेषेच्या दोन मिटर खाली आहेत. गावासह शेती आणि मत्स्य तलावांचे संरक्षण करण्याचे काम संरक्षक बंधारे करतात. 2009 सालापासून सदरचे बंधारे हे एमआयडीसीच्या ताब्यात आले आहेत. गेल्या 15 वर्षात बंधार्‍यांचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथे बांधच शिल्लक राहीलेले नाहीत. त्यामुळे समुद्राला येणार्‍या प्रत्येक उधाणामध्ये समुद्राचे पाणी गावापर्यंत येऊन शेती, मत्स्य तलाव नष्ट होत आहेत. एकीकडे शेती नष्ट होत असताना मत्स्य तलावातील मासे हे खार्‍या पाण्यात वाहून जात आहेत.

26 ऑगस्ट 2022 रोजी खारभूमीचे मुख्य अभियंता यांनी एमआयडीसीला 12 कोटी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन दिले होते. त्यांचे घोडे कोठे अडले हे अद्याप कळलेले नाही. जिल्हा प्रशासनाला देखील फाट्यावर मारणार्‍या एमआयडीसीला आता धडा शिकवण्याची वेळ आली असून लवकरच या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.

धाकटे शहापूर, मोठे शहापूर आणि धेरंड ही गावे तेथील शेती, शाळा, मत्स्य शेती वाचले नाहीत, तर येथील उपजिवका आणि संस्कृती नष्ट होईल अशी भीती भगत यांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआयडीसी आणि श्रमिक मुक्ती दल यांची संयुक्त बैठक 1 मार्च 2023 रोजी पार पडली होती. पोहच रस्ता तयार करण्याची जबाबदारी एमआयडीसी राहील, गावकर्‍यांसाठी पूर्वपार वहिवाटीचा पूर्व-पश्‍चिम रस्ता तयार करावा, आठ दिवसात फुटलेले बांध दुरुस्त करावेत, संपादन क्षेत्रात भराव केल्याने गावे बुडणार आहेत का याचा अभ्यास करावा असे आदेश देण्यात आले होते. याकडेही भगत यांनी लक्ष वेधले. याबाबतचे निवेदन त्यांनी अलिबागचे तहसिलदार विक्रम पाटील यांना दिले आहे.

30 मे 2022 रोजी अंधेरी येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मलीकनेर यांच्यासमवेत अंधेरी येथे बैठक पार पडली होती. या बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आणि काही शेतकरी उपस्थित होते. सदरच्या बैठकीमध्ये पूर्व-पश्‍चिम बांध नव्याने तयार करण्यासाठी खारभूमी विभागाने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते. 
26 ऑगस्ट 2022 रोजी खारभूमीचे मुख्य अभियंता यांनी एमआयडीसीला 12 कोटी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन दिले होते. 
24 जुलै रोजी आलेल्या उधाणामुळे 500 एकर शेती आणि 200 मत्स्य तलावांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये मत्स्य तलावांचे सुमारे दोन कोटी, तर शेतीचे 80 लाखाहून अधिक आर्थिक नुकसानीचा समावेश आहे, अशी माहिती स्थानिक शेतकरी राजन भगत यांनी कृषीवलशी बोलताना दिली.


Exit mobile version