500 खेळाडूंच्या सहभागाने रंगणार क्रीडा थरार

रयत शिक्षण संस्थेच्या नावडे हायस्कूलचा उपक्रम
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील नावडे येथील रयत शिक्षण संस्थेच्यावतीने उन्हाळी क्रीडा शिबिर 16 ते 29 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सलग 13 दिवस चालणार्‍या या क्रीडा शिबिरामध्ये तब्बल 500 खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये 7 प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती शाळेचे चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी कामोठे येथील दत्तुशेठ पाटील विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यापुढे बोलताना बाळारात पाटील यांनी सांगितले की, पनवेल परिसरात खेळाडूंना चालना देण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी कार्यरत तर आहेच आणि आता नावडे नोडमध्ये 25 हजार स्क्वेअर फुटमध्ये क्रीडा भवन उभारण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर क्रीडाप्रेमींना खेळांचे सादरीकरण करता यावे, त्यांच्यातील कलात्मक गुणांना वाव देता येईल, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उन्हाचा तडाखा पाहता या शिबिरातील मैदानी खेळ हे सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात राबविले जाणार आहेत.

समर कॅम्प 2023 मध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंकडून प्रत्येकी 500 रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे. यामध्ये त्या खेळाडूंना टी शर्ट, सकस आहार आदींचा समावेश असणार आहे. तसेच या सहभागी खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती बाळाराम पाटील यांनी यावेळी दिली.

या स्पर्धेतील प्रशिक्षक हे राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक असणार आहेत, तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची देखील या स्पर्धेला उपस्थिती लाभणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या मोकळ्या वेळेत खेळाडूंना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून खेळाडूंना त्यांच्या खेळातील त्रुटी कोणत्या आहेत, त्या कशा सुधाराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमधील खेळाडूंनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बाळाराम पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version