रायगड विभागातील पाच डेपोचे 500 एसटी कर्मचारी हजर

संपात पडली फुट, प्रवाशांमधून समाधान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे मन वळवून त्यांना पुन्हा कामावर हजर करण्यात रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांना यश येत आहे. गुरुवारी पेण आणि महाड एसटी डेपोतील कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी माणगाव, रोहा आणि श्रीवर्धन या पाच आगारातील कर्मचारी देखील कामावर हजर झाले आहेत. एकुण 500 कर्मचारी हजर झाले असून सायंकाळपर्यंत एकूण 105 एसटीच्या फेर्‍या झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांच्या विलीनीकरण वगळता बहुतेक मागण्या मान्य झाल्या नंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी सेवा बंदच असताना रायगड जिल्ह्यातील महाड आणि पेण डेपोतील कर्मचारी गुरुवारी सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर आज रोहा, माणगाव पाठोपाठ श्रीवर्धन डेपोतील एसटी फेर्‍या सुरू झाल्या आहेत. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. शासनात विलीनीकरण या प्रमुख मागणीसह अनेक मागंण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केले आहे. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व डेपोत संपर्क साधून पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केले. विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले की आता परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या अल्टीमेंटम नुसार हजर न होणार्‍या कर्मचार्‍यांवर तीव्र कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कर्मचार्‍यांनी त्वरीत हजर होऊन कारवाई टाळावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शुक्रवारी महाड डेपोतून 48, पेणमधून 34, श्रीवर्धन 5 तर रोहा आगारातून 4 एसटी फेर्‍या अशा एकुण 105 फेर्‍या सुरु झाल्या. सुमारे 1600 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहीती देण्यात आली. रोहा आगारामध्ये एकुण 244 कर्मचारी असून त्यातील आतापर्यंत 25 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. शुक्रवारपासून रोहा तालुक्यातील विरझोळी, नागोठणे, चणेर, कोलाड अशा फ़ेर्‍यांना सुरुवात झाली असून एस.टीच्या 4 वाजेपर्यंत एकून 56 फ़ेर्‍या झाल्या आहेत. सदर एस.टी.वाहतूक सेवा रोहा आगारप्रमुख सोनाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली आहे. जे कामावर आले त्यांना कामावर रुजू करण्यात आले असल्याची माहितीही कांबळे यांनी दिली. तसेच एस.टी. वाहतूक सेवेचा लाभ पूर्वीसारखे सर्व प्रवाशांनी घ्यावे असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणात एस.टी कर्मचार्‍यांनी संपाच्या माध्यमातून पुकारलेल्या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांना खाजगी वाहतूक सेवेचा वापर करावे लागले. ज्यामुळे प्रवाशांना नाहक अतिरिक्त भुर्दड सोसावे लागले. आता एस.टी सेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

Exit mobile version