युवा प्रशिक्षण योजनेतून 508 जागा भरणार

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची वानवा असल्यामुळे अनेकवेळा कामांचा खोळंबा होतो. त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो. जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे. त्यामधून 508 जागा भरण्यात येणार आहेत.

शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्य विभागामार्फत राज्य सरकारने बेरोजगार तरुणांचा मानधन योजनेचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदव्युत्तर, आयटीआय पदवी झालेल्या बेरोजगार तरुणांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी आवश्यक आहे नंतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करता येतील.

जिल्हा परिषदेमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड होईल. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआयसाठी आठ हजार रुपये आणि पदवी, पदव्युत्तर बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेतून जिल्हा परिषदेमध्ये 508 पदांची भरती करण्यात येणार आहे. गुणपत्रकांच्या गुणानुक्रमानुसार ही भरती करण्यात येणार आहे.सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, कनिष्ठ अभियंता, स्त्री परिचर, सफाई कामगार, चौकीदार आदींचा समावेश आहे.

Exit mobile version