7 गावांत पुरपरिस्थितीची शक्यता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील तब्बल 52 गावांचा संभाव्य दरडग्रस्त गावांच्या आणि 7 गावांचा संभाव्य पूरग्रस्त गावांच्या यादीत समावेश करून झाल्यानंतर जुलै महिन्यात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे आदेश प्राप्त झाल्याने यावर्षी पोलादपूर तालुक्यापासून सुटका मिळवू इच्छिणार्या अधिकारी व सरकारी कर्मचार्यांच्या बदल्यांचा खोळंबा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित परिस्थिती या दोन कारणांमुळे दरडप्रवण क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, यादीमध्ये मानवनिर्मित परिस्थितीचा स्पष्ट व स्वतंत्र उल्लेख नसल्याने आपत्ती निवारणकामी संभाव्य दरडप्रवण क्षेत्राखालील गावांची नावे वाढली तर याबाबत कोणतीही गांभिर्याने उपाययोजना केली जात नसल्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये केवनाळे गावाचा समावेश असूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
यंदा संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये लोहारे, कोतवाल खुर्द, सवाद, चरई, केवनाळे, पार्ले, कोंढवी, सडवली, तुटवली, ओंबळी, महाळुंगे, परसुले, येलंगेवाडी-भोगाव, माटवण, हावरे, कणगुले, धामणदिवी, हळदुळे, साखर चव्हाणवाडी, तुर्भेखोंडा, बोरावळे कोडवेकोंड, केवनाळे आंबेमाची, वाकण धामणेची वाडी, चांदके, खोपड, मोरसडे आडाचाकोंड, चिखली, वडघर सोनारवाडी, कामथे, कामथे फौजदारवाडी, मोरसडे बालमाची, मोरसडे सडेकोंड, आडावळे बुद्रुक, लहुळसे, कालवली भोसलेवाडी, कातळी कामतवाडी, कुडपण खुर्द, किनेश्वर, किनेश्वर पेठेवाडी, कापडे खुर्द रवतळवाडी, कुंभळवणे कापडे खुर्द, वाकण मुरावाडी, नाणेघोळ कुदूवाडी कदमवाडी, नाणेघोळ गावठाण, नाणेघोळ बाबरवाडी, नावाळे, महादेवाचा मुरा-बोरघर, चांदले, मोरसडे दिवाळवाडी, कुडपण बुदु्रक, चांभारगणी खुर्द, साखर सुतारवाडी आदी 52 गावांचा समावेश असून पुराचा धोका असणार्या गावांमध्ये पोलादपूर शहर, तुर्भे बुद्रुक, सवाद, चरई, वाकण, कापडे बुद्रुक आणि माटवण आदी गावांचा समावेश आहे. मात्र, याखेरिज, माती व दगड उत्खननासह वृक्षतोड मोठया प्रमाणात झालेल्या ठिकाणी दरडसदृश्य मानवनिर्मित परिस्थिती निर्माण झाली असून संबंधित गावांचा या संभाव्य दरडप्रवण गावांच्या यादीमध्ये समावेश दिसून येत नाही.
पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी आपत्तीनिवारणाच्या मदत आणि बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यानंतर आगामी ऑक्टोबर महिन्यातील संभाव्य जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांसाठीच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना पाल्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात होण्यापूर्वी बदल्या होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, आगामी पूर आणि दरडसदृश्य नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत जुलै महिन्यात सतर्कता आणि सज्जता ठेवण्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाल्याने बदल्या लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने हा खोळंबा सरकारी कर्मचार्यांना चिंताजनक ठरला आहे.