ऑक्टोबर महिन्यात 55 लाखांचा दंड वसूल

पनवेल तहसील विभागाची कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

सरकारचा महसुल बुडवूनी रेती, खडीची वाहतूक करणाऱ्या 24 वाहनांवर पनवेल तहसील विभागाने ऑक्टोबर महिन्यात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 55 लाख 75 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या महिन्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. इमारतींची कामे देखील वेगाने सुरू आहेत. यासाठी लागणारी रेती, खडी महसुल बुडवून घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. बेकायदेशीर वाहतूक सुरू असताना यावर कारवाई होणे अपेक्षित होती. पनवेल तहसील विभागाने यावर लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत रेती, खडीची वाहतूक करणाऱ्या 40 वाहनांवर पनवेल तहसील विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 81 लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर काही गाड्यावर कारवाई करतेवेळी गाडी चालक गाडी घेऊन पळून गेलेले आहेत. या गाड्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आली. यातील चार गाड्यांवर खारघर पोलिस ठाणे, पनवेल शहर पोलिस ठाणे आणि एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पनवेल परिसरात आजही वाहनांमध्ये ज्यादा माल भरुन वाहने धावत आहेत. या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.

Exit mobile version