दिवसेंदिवस वाढतोय खिशावरचा भार; आता ‘ही’ सेवाही महागणार

। मुंबई । प्रतिनिधी ।
गॅस, पेट्रोल, डिझेलनंतर आता मोबाईलचे बिलदेखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढीचे कनेक्शन थेट 5 जी सोबत संबंधित आहे. 5जी स्पेक्ट्रमसाठी बोली संपली असून या लिलावात दूरसंचार कंपन्यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. 5जी स्पेक्ट्रम लिलावात करोडो रुपये खर्च करणार्‍या कंपन्या ग्राहकांकडून हा पैसा वसूल करणार आहेत.

खर्च केलेली रक्कम वसूल करण्यासाठी टेलकोस जास्त किमतीत 5जी देऊ शकतात. एवढेच नाही तर ते 4जी सेवेच्या किमती वाढवू शकतात असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आधीच कंपन्यांनी डिसेंबर 2019 आणि नोव्हेंबर 2021 मध्ये दोनदा दर वाढवले होते. 5जी स्पेक्ट्रमसाठी बोली लावणार्‍यांमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि अदानी डेटा नेटवर्कचा समावेश आहे. त्यांच्याकडे 51,236 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आहे. यासाठी त्यांनी एकूण 1,50,173 कोटी रुपये खर्च केले आहेत, जे विश्‍लेषकांनी पूर्वी केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या आक्रमक बोलीमुळे हे घडले आहे.

दरम्यान, ऑक्टोबरपासून 5जी स्पेक्ट्रम सुरू होण्याची शक्यता असल्याचे दूरसंचार मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तर वर्षभरात ही सेवा देशभरात सुरू होईल. भारतात 5जी सेवा सुरू करणारी रिलायन्स जिओ कदाचित पहिली असेल. अलीकडेच रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की कंपनी भारतात 5जी सुरू करून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करेल. तर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला 5जी सेवा सुरु करण्यास थोडा विलंब होऊ शकतो. याचे कारण त्यांच्या पायाभूत सुविधांमधील आव्हाने मानले जात आहे. टॅरिफमध्ये 4 टक्के वाढ केल्याने दूरसंचार कंपन्या त्यांचे 5जी खर्च भरून काढू शकतात. एवढेच नाही तर स्पेक्ट्रम खरेदीचा खर्च भागवण्यासाठी टेलकोस त्यांच्या 5जी सेवा 30 टक्के जास्त दराने सुरू करू शकतात.

Exit mobile version