| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी (दि. 22) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला ज्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यात डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे.
डोंबिवलीतील तीन रहिवासी या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. तसेच एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. संजय लेले (44), अतुल मोने (52) आणि हेमंत जोशी हे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. तर, संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेली आहे. त्यामुळे तो देखील जखमी झाला आहे. अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात राहतात. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्याबरोबर हेमंत जोशी व संजय लेले हे देखील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कौस्तुभ व संतोष हे आपल्या कुटुंबीयांबरोबर काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी त्यांना धर्म विचारला, त्यानंतर गोळ्या झाडल्या. कौस्तुभ व संतोष या गोळीबारात जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य व स्थानिकांनी रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पनवेलमधील दिपील भोसले (60) यांचा देखील या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच भोसले यांच्याबरोबर काश्मीरला गेलेले सुबोध पाटील (42) हे जखमी असून, त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.