धुळीतून प्रवास करण्याची प्रवाशांवर वेळ; आमदारांचे आश्वासन फेल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राज्यात महायुतीतील भाजप-शिवसेना यांच्यात दररोज खटके उडत असताना, भ्रष्टाचारामध्ये मात्र या दोन्ही पक्षांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे. परंतु, याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याचे चित्र अलिबाग-रोहा रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे समोर आले आहे. या रस्त्यासाठी 170 कोटींचा निधी मंजूर असून, आतापर्यंत 60 कोटी खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. मग, एवढ्या पैशांची कामे झाली तरी कुठे? कारण, रस्त्यावरुन जाताना अद्याप जनतेला धुरळाच खावा लागत आहे. मग, हा पैसा स्वखर्चाने रस्ता तयार करुन देण्याचे फसवे आश्वासन देणारे आमदार आणि ठेकेदाराच्या घशात गेला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
स्वखर्चाने रस्ता तयार करून देईन, असे आश्वासन आ. महेंद्र दळवी यांनी मागील निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, हे आश्वासन फेल ठरल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. अलिबाग-रोहा मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांतून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, खड्ड्यांतून आणि आता धुळीतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या रस्त्याचे काम अपुरेच असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. फसवे आश्वासन देणाऱ्या आमदारांविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
अलिबाग ते माणगावमधील साईपर्यंत 84 किलोमीटरचा रस्ता हॅम योजनेंतर्गत मंजूर झाला. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा’ या धर्तीवर रस्त्याचे काम करण्यात आले. एका कंपनीला कामही देण्यात आले. परंतु, परवडत नसल्याने सांगून त्या कंपनीने काम अर्धवट टाकून दिले. त्यामुळे गेली अनेक महिने या रस्त्याचे काम रखडले होते. विद्यमान आमदार दळवी यांनी अनेक वेळा नारळफोडीचा कार्यक्रम राबविला. मात्र, त्या रस्त्याच्या कामाला काही मुहूर्त लागला नाही. अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, त्यावरूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू होता. आता शिंदे गटातील आणि पूर्वीचे भाजपचे दिलीप भोईर आणि दळवी यांच्यामध्ये घणाघाती वाक्युद्ध सुरू झाले होते. दरम्यान, वेलवली-खानाव, खानावपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले.
हॅममधून मंजूर होऊन अपूर्णावस्थेत असणारा अलिबाग-रोहा रस्ता आता खड्ड्यांमुळे जाम झाला आहे. खानाव ते सुडकोली हा प्रवास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. खास करून नांगरवाडी ते भागवाडीमधील खिंडीची अवस्था दयनीय झाली आहे. अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अलिबागपासून रोहा साईपर्यंत 84 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे 50 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जात आहे. यासाठी 60 कोटींहून अधिक रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोलीपासून अलिबागपर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता खड्डेमय आहे. आता धुळीचे कण नाका-तोंडात जात आहेत. खड्डे चुकविताना अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विद्यमान आमदारांनी अनेक वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. त्याला सहा वर्षे होत आली आहेत. परंतु, या कालावधीत हा रस्ता पूर्ण करण्यास आमदार अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. अलिबाग-सुडकोली मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. अनेक वेळा एसटी बसेसदेखील या रस्त्यावर नादुरुस्त होत आहेत. विद्यमान आमदारांनी चांगल्या रस्त्याचे दाखवलेले स्वप्न पूर्णतः भंगले आहे.
भ्रष्टाचारासाठी भाजप, शिंदे गटात एकी?
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी अहमदाबाद या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. ही कंपनी काम करीत असली, तरीदेखील या कंपनीच्या पडद्यामागील सूत्रधार भाजपमधील एक बडा नेता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कृपेने कामे न होताच, शंभर कोटीहून अधिक रक्कम काढण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. महायुतीमधील शिंदे आणि भाजप यांच्यात कितीही राजकीय वाद असले, तरीदेखील भ्रष्टाचारासाठी दोघांची एकी कायमच असते, असे बोलले जात आहे. मात्र, यामध्ये सर्वसामान्यांच्या पैशांची लूट करुन त्यांची अक्षरशः फसवणूक होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम सोमवारपासून सुरु केले जाणार आहे. मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण या धर्तीवर हे काम केले जाणार आहे.
मोनिका धायतडक, मुख्य कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग
