। रायगड । खास प्रतिनिधी ।
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. पहिल्याच पावसामध्ये महामार्गावर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात अतिशय दयनीय अवस्था झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या कालावधीत सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च झाला असून गणेशोत्सवापूर्वी रस्त्या सुस्थित करण्याची मागणी जोर धरत आहे.
ऐन पावसाळयात मुंबई-गोवा
हायवेची दयनीय अवस्था
गेली 12 वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्णच अवस्थेत आहे. रायगड जिल्ह्यातला बहुतांश भाग हा अर्धवट स्थितीतच असल्याचे पाहायला मिळत आहे. नागोठणे जवळील एका वळणावर या महामार्गाचे सूरु असलेले काम प्रवासी वर्गाला मात्र डोके दुःखी ठरत आहे. संपुर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने येथील वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे या संपूर्ण प्रकाराला कारणीभूत ठरत असून जणू अपघाताला आमंत्रणच देत असल्याचे चित्र आहे.
वाहन चालकांचा जीव मुठीत
घेऊन प्रवास
रायगडमध्ये रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पायाभूत मूलभूत नागरी समस्या जैसे थेच असून आजवरचे लोकप्रतिनिधी या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. हे यातून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोकणात जोरदारा पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या मातीचे रुपांतर चिखलात झाले आहे. या चिखलातून वाहनचालकांना वाट काढताना फारच त्रास सहन करावा लागत आहे. येथून प्रवास करताना अपघाताची भीतीही आहे. मागील अनेक वर्षांपासून काम रखडलेलेच पाहायला मिळत असल्याने नाराजीचा सूर आहे.
10 वर्षात 6000 कोटी खर्च मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गेल्या 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले असल्याची माहिती याआधी माहिती अधिकारातून समोर आली होती. मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पावरील खर्चाची महत्त्वाची महिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी यासंबंधी मिळवलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
दुरुस्तीच्या कामासाठी 192 कोटी रुपये खर्च केंद्र सरकार आणि महाराष्ट्र पीडब्ल्यूडी या दोघांकडून आरटीआय कायद्यांतर्गत या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी महामार्गासाठी एकूण 6000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा खर्च रस्त्याच्या सध्याच्या स्थितीच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.