10 ऑक्टोबरपर्यंत शिधा पोहचविण्याचा प्रयत्न
| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा 15 दिवसांपूर्वी देण्यास सुरुवात केली. आजपर्यंत तीन लाख 65 हजार 419 शिधाधारकांना शिधा मिळाला आहे. मात्र र64 हजार 435 जण त्यापासून अजूनही वंचित आहेत. दक्षिण रायगडमध्ये शिधा न मिळालेल्यांची संख्या जास्त आहे. शिधा कधी मिळणार याकडे त्यांचे डोळे लागले आहेत.
जिल्ह्यात एक हजार 400 रास्तभाव दुकाने आहेत. 21 गुदामे आहेत. राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत धान्य घेणाऱ्या चार लाख 29 हजार 854 शिधाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले. रवा, साखर, पामतेल, चणाडाळ या 17 लाख 19 हजार 416 वस्तूंची मागणी केली होती. 21 सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के आनंदाचा शिधा जिल्ह्यातील दुकानांमध्ये पोहचला. मात्र गणरायाच्या स्वागताच्या तयारीची लगबग असल्याने शिधा नागरिकांपर्यंत त्या कालावधीत पोहचला नाही. पाच दिवसाच्या विसर्जनानंतर दुकानांमधून तो वितरीत करण्यास सुुरूवात झाली.
कर्जत तालुक्यात 93 टक्के म्हसळामध्ये 91 टक्के, उरण, श्रीवर्धनमध्ये 88 टक्के, मुरुड, रोहा व अलिबागमध्ये 86 टक्के तर सुधागडमध्ये 79 टक्के, महाडमध्ये 77 टक्के, तळामध्ये 75 टक्के नागरिकांना वितरण झाले आहे. या आकडेवारीनुसार दक्षिण रायगडमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेने शिधा वितरणाचा टप्पा फारच कमी असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत 85 टक्के जणांपर्यंत हा शिधा पोहचला आहे. उर्वरित 15 टक्के नागरिकांना शिधा दहा ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. जिल्ह्यातील दुकानांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध झाला आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.