डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पर्यावरण रक्षणाचे भान ठेवत, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने निर्माल्य संकलन व खतनिर्मिती हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानच्या पाच हजार श्रीसदस्यांनी गिरगाव आणि जुहू चौपाट्यांवर एकूण 6742 टन निर्माल्य गोळा करत स्वच्छतेचा संदेश दिला. हा उपक्रम पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनीदेखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. निर्माल्य स्वखुशीने श्रीसदस्यांकडे सुपूर्द करून, पर्यावरण रक्षणात आपले योगदान दिले.
खतनिर्मितीसाठी यंत्रसज्जता
गिरगाव आणि जुहू चौपाटीवरच खतनिर्माण करणारी यंत्रे बसविण्यात आली होती. श्रीसदस्यांनी भाविकांकडून गोळा केलेल्या निर्माल्यापैकी फक्त फुले आणि पाने यंत्रामध्ये टाकली. हारांतील धागे, दोरे वेगळे करण्यात आले. यंत्रामार्फत फुलांचा चुरा करून तो गोण्यांमध्ये साठवण्यात आला. त्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाणार आहे. हे सेंद्रिय खत, प्रतिष्ठानच्या विविध वृक्षारोपण उपक्रमांमध्ये वापरले जाणार असून, यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे श्रीसदस्यांनी सांगितले.
उपक्रमाला प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठिंबा
या उपक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री योगेश कदम, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, आ. अशोक चव्हाण, मंगलप्रभात लोढा, अनिल परब, उपायुक्त भाग्यश्री वर्तक, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, अमृता फडणवीस, सुखराज नाहर, निरंजन हिरानंदानी, मिकी मेहता आदी मान्यवरांनी भेट देत, श्रीसदस्यांचे कौतुक केले.









