69 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई शहरची दोन्ही गटात आगेकूच, रायगड नाशिकचा सामना बरोबरीत
। भिवंडी । प्रतिनिधी ।
मुंबई शहर सह मुंबई उपनगर, अहमदनगर, नांदेड यांनी पुरुषांत, तर रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, पालघर, औरंगाबाद, कोल्हापूर यांनी महिलात 69व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व वेताळ क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने बंदर्‍या मारुती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या ब गटात मुंबई शहरने औरंगाबादला 51-20 असे चकवीत साखळीत पहिला विजय मिळविला. सिद्धेश पिंगळे यांच्या जोरकस चढाया त्याला मयूर शिवतरकरची मिळालेली भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विश्रांतीला मुंबईकडे 27-10अशी आघाडी होती. औरंगाबादचा अनित चव्हाण चमकला.
क गटात रायगडला नाशिकने 28-28असे बरोबरीत रोखले. मिथुन मोकल, राज पाटील, अमीर धुमाळ रायगडकडून तर आकाश शिंदे, पवन भोर, दिपक अहिर नाशिककडून उत्कृष्ट खेळले. मुंबई शहरच्या महिलांनी ब गटात मेघा कदम, साधना विश्‍वकर्मा यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर नाशिकला 42-25 असे नमवले. पूर्वार्धात 26-07 अशी मुंबईकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र नाशिकच्या पावणी निकम, गायत्री काटे यांना सूर सापडला.पण संघाला विजय मिळवून देण्यात त्या कमी पडल्या.
कोल्हापूच्या महिलांनी फ गटात सातार्‍याचा 35-21 असा पराभव केला तो मृणाली टोपणे, गोपिका ऐळके यांच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर. जळगावची दक्षता चव्हाण चमकली. कोल्हापूरच्या पुरुषांना फ गटात मात्र हिंगोली बरोबर 26-26 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्यांताराला 16-18अशा पिछाडीवरून कोल्हापूरने ही बरोबरी साधली. तेजस पाटील, ऋषिकेश गावडे, शरद पोवार कोल्हापूरकडून, तर आफताब शेख, राजेश बोराडे, वैभव पाईकराव हिंगोलीकडून उत्तम खेळले. पुरुषांच्या इ गटात मुंबई उपनगरने जळगांववर 56-12 अशी मात केली. आकाश गायकवाड, अभिषेक नर या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रविण बिराडे, प्रल्हाद सोनावणे जळगांवकडून बरे खेळले. ड गटात सांगलीने भागेश भिसे, अभिषेक गुंगे, कृष्णा मदने यांच्या चढाई-पकडीच्या उत्तम खेळाने लातूरवर 45-17 असा विजय मिळविला. मध्यांतराला 18-07 अशी सांगलीकडे आघाडी होती. लातूरचा प्रदीप आकनगीरे एकाकी लढला. ब गटात अहमदनगरने सोलापूरचा 54-13असा धुव्वा उडविला. प्रफुल्ल झावरे, शंकर गवई, संभाजी वाबळे यांच्या खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. क गटात नंदूरबारने जालनाचा 42-25 असा पाडाव केला.

Exit mobile version