मात्र काम अत्यंत संथगतीने सुरु
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यावरील महत्वाचा पूल समजला जाणारा कर्जत शहरातील दहिवली येथील श्रीराम पूल मागील काही वर्षे सातत्याने वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी आहे. त्यामुळे या ठिकाणी जुन्या पुलाच्या अगदी बाजूला नवीन पूल उभारला जात आहे. शासनाने या पुलासाठी तब्बल साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या पुलाचे बांधकाम सुरू असून या नवीन पुलामुळे कर्जत श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कर्जत येथे दहिवली गावातील श्रीराम पूल काही वर्षांपासून सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. या भागातील इतर रस्ते रुंद झाले आहेत. मात्र, श्रीराम पुल निर्मितीपासून आहे तेवढाच आहे. त्यामुळे कर्जत-मुरबाड रस्त्यावर नवीन पुलाच्या कामाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून कामदेखील सुरु आहे. पण श्रीराम पुलाचे काम हे अत्यंत संथगतीने सुरु असल्याचे वाहनचालकांकडून सातत्याने बोलले जात आहे.
तसेच, उल्हास नदीवरील नवीन पुलासाठी आठ पिलर आहेत. मात्र, वर्षभरात केवळ चारच पिलर उभे राहिले असून एका पिलारचे काम अर्धवट आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम पावसाळ्याआधी होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे. त्यात ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवास वर्षभर असतो अगदी त्याच भागात पुलाचे पिलर अद्याप उभे राहिलले नाहीत. त्यामुळे कर्जत शहरातील या नवीन पुलामुळे श्रीराम पुलावरील वाहतूक कोंडीचे संकट दूर होणार असून सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाचे कामाकडे प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे वाहनचालक व्यक्त करीत आहेत.