| पेण | वार्ताहर |
पेणमध्ये परस्परांचे दोन राजकीय कट्टर वैरी असणारे धैर्यशील पाटील आणि रवीशेठ पाटील हे एकत्र आले खरे; परंतू खालच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र सर्व पेण तालुक्यात दिसत आहे. हे दोन नेते एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूका पेणमध्ये लागल्या असून या दोन्ही नेत्यांचा नेतृत्वाचा कस पहायला मिळत आहे.
भाजप पेण तालुका अध्यक्ष हा कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यापेक्षा दुही निर्माण कशी होईल. यासाठी पुरेपुर प्रयत्नात आहे. त्यातच जिल्हा चिटणीस मिलींद पाटील हे त्याला खतपाणी घालत आहेत. हे दोन्ह रवी पाटील गटाचे असून तालुक्यात धैर्यशील पाटील यांच्या गटाला तगडे पद नसल्याने धैर्यशील पाटील यांच्या कार्यकर्त्यांना कसे खच्ची करता येईल; असाच काहीसा प्रकार सुरु आहे.
वाशीमध्ये संदेश ठाकुर यांनी जयंत पाटील यांची मदत घेतली. तरणखोपमध्ये डी.बी.पाटील यांनी जगदीश ठाकुर यांच्याशी हातमिळवणी केली. तर दुष्मी ग्रामपंचायतीमध्ये भाजप विरुध्द भाजप, बळवली ग्रामपंचायतीमध्ये देखील रवीशेठ पाटील विरुध्द धैर्यशील पाटील गट, तिच स्थिती दिव ग्रामपंचायतीमध्ये आहे. दिव ग्रामपंचायतीमध्ये गेली 5 वर्ष विवेक म्हात्रे या तरुणाने रवी पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात जोमाने विकासकामे करुन ग्रामपंचायती हद्दीतील वस्त्या-वाडयांमध्ये विकासकामे नेली. याचाच राग ठेऊन श्रीकांत पाटील आणि मिलींद पाटील यांनी विवेकचा काटा काढण्यासाठी राजकीय डाव खेळला आहे. पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमधील जवळपास 7 ग्रामपंचायतीमध्ये भाजप विरुध्द भाजप अशीच लढत पहायला मिळणार आहे.