। म्हसळा । वार्ताहर ।
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आसतानाच पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यांत सर्वात जास्त पावसाची नोंद म्हसळा तालुक्यांत 1478.8 मिमि तर सर्वात कमी खालापूर तालुक्यांत 864.8 मिमि नोंद झाली आहे.
भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे म्हसळा तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. म्हसळा तालुक्यातील 60 ते 70टक्के शेतकर्यांची भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत. तालुक्यात एकूण 1350 हेक्टर भात शेती आहे, त्यापैकी अंदाजे 750 हेक्टर लागवड झाली आहे. तालुक्यामध्ये नाचणीचे 260 हेक्टर क्षेत्र असून नाचणी लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतात चिखल करत शेतकर्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. भात लावणी करताना ओले चिंब अंग आणि लावणीचे श्रम विसरण्यासाठी महिला कामगारांत वेगवेगळ्या गीतांचे स्वर ऐकू येत आहेत. मागील आठवड्यापासून अत्यंत समाधानकारक पाऊस पडत आसल्याने नाचणी, वरी लावणीला सुद्धा वेग आला आहे. मौजे काळसुरी, आडीठाकूर-पाष्टी तालुक्यांत कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे, कृषी पर्यवेक्षक सुजय कुसळकर, रामेश्वर मगर, कृषी सहाय्यक धनंजय सरनाईक, गणेश देवडे, कल्पना शेळके यांनी आपापल्या कार्यक्षेत्रांत जाऊन शेतकर्यांना लावणी, पाणी निचरा पद्धत तसेच खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.