मुरुड तालुक्यात 76 मिलीमीटर पाऊस

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
1 डिसेम्बर रोजी सकाळच्या प्रहरी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरा पर्यंत टिकून राहिल्याने मुरुड तालुक्यात 76 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. पावसाने सातत्य कायम राखल्याने मुरुड तालुक्यातील काही भागात भात पिकाचे मोठे नुकसान झालेे.विशेषतः पंचक्रोशी भागातील वावे,वेळास्ते,उसरोली,अदाड,मजगाव,विहूर,आंबोली,आदी सह असंख्य गावांना याची झळ सोसावी लागली आहे.
भात पीक तयार झाल्यावर त्याची कापणी केली जाते.व कापलेला भात हा उंच असा डोंगर करून मोठ्या प्रमाणात साठवला जातो. भात झोडण्यासाठी काही गावात एकमेकांना सहकार्य करण्याची पद्धत आहे.म्हणजे गावातील एका व्यक्तीचा भात झोडून झाला कि दुसर्‍याला मदत करण्याची परंपरा आहे. त्यामुळे भाताचे ढीग साठवण्यात येतात व ज्याचा त्याचा नंबर झाल्यावर भात झोडणी केली जाते. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे.कारण शेतामध्ये असलेले भात पीक 76 मिलीमीटर पाऊस पडल्याने संपूर्णतः भिजल्याने भात पिकांबरोबरच पेंढ्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पावसाळा संपल्यावर पेंढ्याचा उपयोग शेतकर्‍याच्या गाय,बैल व म्हैस याना उपयोगी पडत असतो परंतु या अवकाळी पावसामुळे पुढील काळात पेंढ्याचा मोठा तुटवडा पडणार आहे.

Exit mobile version