महाड गांधारी नदीपुलासाठी आठ कोटी मंजूर

| महाड | प्रतिनिधी |

शंभरी ओलांडलेल्या महाडमधील गांधारी नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पूल लवकरच इतिहास जमा होणार आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी आठ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. नवीन पुलाच्या तांत्रिक कामालाही सुरुवात झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून महाड शहरात प्रवेश करताना गांधारी नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे. 1921 मध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. त्यानंतर पूल रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात देण्यात आला. सध्या पुलाचा एका बाजूचा रस्ता महाड नगरपालिकेच्या ताब्यात तर पूल व शहरात प्रवेश करणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती व रस्त्याचे कामात दिरंगाई होत होती. जुलै 2021 मध्ये गांधारी नदीवरील हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सध्या पुलावरून लहान वाहनांची वर्दळ सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक असल्याचा निष्कर्ष पुढे आल्याने नवीन पुलाची निर्मितीचा प्रस्ताव पुढे आला. आता पूल व त्या परिसरातील रस्ता महाड नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आल्याने देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न संपुष्टात आला आहे. नवीन पूल, रस्त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर पुलाचे अंदाजपत्रक, तसेच पुलाची उंची, रस्त्याचे निर्मिती यासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून या कामांना सुरुवात झाली आहे.

एसटी प्रवाशांची गैरसोय
पूल धोकादायक असल्याने अवजड वाहनांसह एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या एसटी दस्तुरी नाकामार्गे महामार्गावरून ये-जा करत असल्याने प्रवाशांना तिकिटाचे अतिरिक्त शुल्क आकारले जाते. शिवाय गांधारी बंदर येथे एसटीत बसणाऱ्या प्रवाशांना बस स्थानक अथवा शिवाजी चौक येथे यावे लागते. दोन वर्षांपासून प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
102 वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल
गांधारी नदीवरील पूल कमान पद्धतीचा बांधण्यात आला असून पुलाला जवळपास सहा कमानी आहेत. पुलाची उंची फारशी नसून एका बाजूला नंबर आणि दुसऱ्या बाजूला 1921 असा उल्लेख करण्यात आला आहे. सावित्री नदीला गांधारी नदी याच ठिकाणी मिळते, त्यामुळे दरवर्षी पुलावरून पुराचे पाणी जाते. त्यामुळे पुलाचे कठडेही वाहून जातात. पुरामुळे येथील वाहतूक विस्कळित होते. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव अनेकवर्षे रखडला होता, परंतु आता या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. नव्याने होणाऱ्या पुलाची उंची वाढवली जाणार आहे.

गांधारी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आवश्यक असणारी तांत्रिक कामे पूर्ण करण्याकरता तांत्रिक सल्लागार एजन्सी नेमली जाणार आहे.

प्रदीप कदम,
नगर अभियंता, महाड नगरपालिक
Exit mobile version