गोविंदा पथकांना दहीहंड्यांचे वेध; रायगडात फुटणार ८,१६७ हंड्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगडातील गोविंदा पथकांना शुक्रवारी (दि.19) साजर्‍या होणार्‍या दहीहंडीचे वेध लागले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर साजरा होणारा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कंबर कसली आहे. रायगड पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत 1928 सार्वजनिक तर 6239 खासगी अशा एकूण 8167 हंड्या फुटणार आहेत. गेले दोन वर्षे कोरोनामुळे दहीहंडी फोडण्यावर निर्बंध घातले होते.पण आता हे सारे निर्बंध उठविण्यात आलेले आहेत. शिवाय सरकारनेही गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे शुक्रवारी साजर्‍या होणार्‍या दहीहंडी सोहळ्यात गोविंदा पथकांचा जोर दिसून येणार आहे.

अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लावल्या जाणार आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. मानाच्या दहीहंड्या फोडण्याबरोबरच लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाटी गोविंदा पथकांनीही कंबर कसली आहे. यासाठी गेले महिनाभर पथकातील खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. रायगड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रायगडात 1928 सार्वजनिक तर 6239 खासगी अशा एकूण 8167 दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. तर 160 सार्वजनिक मिरवणुका निघणार आहेत.

शेकापतर्फे दहीहंडीसाठी भरघोस बक्षिसे
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी 1 लाख 11 हजार 111 रुपये व चषक असे पहिले बक्षिस ठेवण्यात आले आहे. शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता शेतकरी भवन अलिबाग येथे ही स्पर्धा होणार आहे. पुरुष व महिला पथक सलामीसाठी (5 थर) 15 हजार रुपये याशिवाय आकर्षक चित्ररथ स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार, तृतीयसाठी 5 हजार रुपये असे बक्षिस दिले जाणार आहे. ही स्पर्धा अलिबाग शहरापुरतीच मर्यादित आहे. तर दहीहंडी स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित असल्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.

Exit mobile version