श्रीबाग स्टेट बँकेची 83 लाखांची फसवणूक

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत बँक मॅनेजरला केले निलंबित

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

बनावट कागदपत्रांच्या आधारे वैयक्तिक कर्ज घेऊन श्रीबाग येथील भारतीय स्टेट बँकेची २८ भामट्यांनी ८३ लाख १९ हजार ४२७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई प्रशासनाने केली आहे.

अलिबागमधील श्रीबाग येथील बँकेच्या शाखेतील अधिकाऱ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले आहे. या शाखेत २८ जणांनी (सर्व राहणार वेगवेगळ्या ठिकाणी) वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला होता. हे सर्व विविध ठिकाणी काम करीत असून कर्जासाठी लागणारी बनावट कागदपत्रे त्यांनी बँकेकडे सादर केली होती. १ मार्च २०१८ ते १ सप्टेंबर २०२२ या दरम्यान कर्ज घेतले होते. कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करण्याची जबाबदारी शाखा व्यवस्थापकांची होती. मात्र, ती न करता २८ जणांना त्यांनी ८३ लाख १९ हजार ४२७ रुपये कर्ज वितरीत केले होते.

कर्जदारांनी कर्जाचा हप्ता न भरल्याने वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी २८ कर्जदारांनी बनावट कागदपत्र देऊन बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. असे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी सांगितले.

Exit mobile version