जिल्ह्यातले निम्मे डेपोतून 137 फेर्या धावल्या
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या 20 व्या दिवशी रायगड जिल्ह्यातील सात डेपोपैकी चार डेपोमधील 2 हजार 200 पैकी 880 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. आज तब्बल 137 फेर्या धावल्याने प्रवाशी वाहतूक सुरुळीत होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, संपाची हाक देणार्यांना बाजूला ठेवून सरकारच्या संघटनांसोबतच चर्चा करुन संप मोडित काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी केला आहे. आतापर्यंत रायगड विभागातील महाड, पेण, रोहा, माणगाव तसेच श्रीवर्धन या पाच आगारातील 260 प्रशासकीय, कार्यशाळा 290, चालक आणि वाहक 330 असे एकूण 880 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आज महाड आगारातून 52, पेण आगारातून 31, रोहा 18, माणगाव 23 तर श्रीवर्धन आगारातून 13 अशा एकूण 137 एसटीच्या फेर्या पुर्ण झाल्या. मुरुड, कर्जत आणि अलिबाग आगारातील कर्मचार्यांसोबत बोलणे सुरु असून तेही कर्मचारी लवकरच पुन्हा हजर होतील अशी अपेक्षा विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एसटी कर्मचार्याच्या संपाची हाक अलिबाग आगाराने आणि कनिष्ठ वेतन कर्मचारी संघटनेने दिली होती. कृती समितीत राज्यातील बावीस संघटना आहेत. आझाद मैदानावर 18 संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. मात्र मंत्र्यांसोबत चर्चेला काँग्रेसची इंटक, शिवसेनेची कामगार सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगार संघटना या सरकारच्या पक्षातील संघटनेचे कृती समितीतील सदस्य उपस्थित होते. असा आरोप अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी केला आहे. त्यामुळे ज्यांनी संपाची हाक दिली त्यांच्यासोबत शासनाला चर्चा करायला वेळ नाही. असा आरोप अलिबाग आगारातील कर्मचार्यांनी केला आहे. आमची आजही विलीनीकरणाची मागणी ही ठाम आहे. अशी भूमिका अलिबागमधील कर्मचार्यांनी घेतली आहे. जिल्ह्यात पाच आगारातील कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले असले तरी ते कर्मचारी संख्येपेक्षा दोन टक्केच आहेत. पुन्हा हे कर्मचारी संपात सहभागी होतील अशी आशा आहे. ज्यांनी अधिकृत संपाची हाक दिली त्यांना बाजूला ठेवून ज्याचा काहीही संबंध नाही अशांना बोलणी करण्यासाठी बोलवता, ज्याचा संबंध नाही ते आम्हाला संप मोडीत काढून कामावर हजर होण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे हे सदस्य संपावर तोडगा काढण्यासाठी गेले होते की मोडीत काढण्यासाठी असा आरोप कर्मचार्यांनी केला आहे.