। माणगाव । वार्ताहर ।
माणगावजवळील मोर्बा-साई जुन्या रस्त्यावर मोर्बा गावच्या हद्दीत दोरी बांधून गाडी आडवून चालकाच्या डोळ्यात मसाला पावडर मारून गाडीतील ९२ हजाराची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून चोर फरार झाला आहे. सदरची घटना दि.१८ जुलै २०२२ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती फिर्याद रवींद्र दत्ताराम अधिकारी (वय-४०) रा.साईकोंड, माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेची फिर्यादी रवींद्र दत्ताराम अधिकारी हे रात्री मोर्बा येथील आपले दुकान बंद करून रोख रक्कम बॅगेत ठेऊन स्वतःची गाडी क्रमांक एमएच ०६/ बीएम/१६०१ हि चालू करून गाडीच्या डाव्या बाजूला सीटवर ९२ हजार रुपये रोकड असलेली पैशाची बॅग ठेऊन चालवीत मोर्बा ते साईकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्याने जात असताना रस्त्यावर नायलॉनची जाडी रस्सी बांधली असल्याचे दिसल्याने फिर्यादी यांनी आपली गाडी थांबविली. यावेळी गाडीजवळ एक अज्ञात आरोपी येऊन त्याने फिर्यादी यांच्या डोळ्यात मसाला पावडर मारून त्याच्या हातात असलेल्या चाकूने फिर्यादीवर हल्ला केला असता तो फिर्यादी याने चुकवून फिर्यादी हे गाडीमधरून बाहेर पडून पळून गेले.
त्या दरम्यान फिर्यादी यांच्या गाडीतील २०००,५००,२००,१००,५०,२०,१० रुपये दराच्या भारतीय चलनातील नोटा असे एकूण ९२ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने जबरी चोरू करून तो फरार झाला आहे. या घटनेची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे, मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२०७/२०२२ भादवि संहिता कलम ३४१,३९४ प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते हे करीत आहेत.