जिल्ह्यात 93.41 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नागरिकांनी डोस घेण्याचे आवाहन, 100 टक्के लसीकरण उदिष्ट
|अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
देशात 100 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लसीकरणाचे 100 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात 93.41 टक्के नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, 62.41 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. ज्या नागरिकांचा पहिला डोस बाकी आहे, तसेच ज्या नागरिकांचे पहिल्या व दुसर्‍या डोस मधील निर्धारित अंतर पूर्ण झाले आहे, त्यांनी लसीचा डोस घ्यावा व जिल्ह्याचे 100 टक्के लसीकरण उदिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात 18 वर्षांवरील 21 लाख 92 हजार 500 लाभार्थी आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 34 लाख 16 हजार 691 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले असून, यामधील 13 लाख 68 हजार 606 लाभार्थ्यांना लसीचे दोनही डोस म्हणजे 27 लाख 37 हजार 212 डोस देण्यात आले आहेत. तर 6 लाख 79 हजार 478 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 1 लाख 44 हजार 415 लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. रायगड जिल्ह्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे मात्र दुसर्‍या डोस मधील निर्धारित अंतर पूर्ण झाले असूनही दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती, डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 569 लसीकरण केंद्रे
रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 569 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांमध्ये 245 लसीकरण केंद्र सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्या अखत्यारीत 28 तर पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत 28, तसेच खासगी 268 लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रीसुत्री
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मात्र अद्याप पूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वेळोवेळी सॅनिटाईझरने हात स्वच्छ करावेत, एकमेकांसोबत बोलताना सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version