| मुंबई | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शनिवारी दुपारी तीन वाजता संपली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या 5 जागांसाठी 97 उमेदवार रिंगणात राहिल्याचं स्पष्ट झालंय. यात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर आणि भंडारा-गोंदिया या लोकसभेच्या 5 मतदारसंघांमध्ये (दि.19) एप्रिलला मतदान होणार आहे. त्या मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केलेल्या 13 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले. यानंतर आता नागपूरमध्ये 26, चंद्रपूरमध्ये 15, रामटेकमध्ये 28, भंडारा-गोंदियामध्ये 18, तर गडचिरोलीत 10 उमेदवार लोकसभेत आपलं नशीब आजमावतील. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे सर्व मतदारसंघ हे विदर्भातील आहेत.
रामटेक वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये भाजपा आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत होणे अपेक्षित आहे. तर रामटेकमध्ये काँग्रेसचे श्याम बर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे आमनेसामने आहेत. नागपूरमध्ये गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसनं आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीय. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा सामना होईल. गडचिरोलीत भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान आणि भंडारा-गोंदियात भाजपाचे खासदार सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशा लढती रंगतील.






