| आगरदांडा | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेले दोन दिवस पुन्हा धो-धो सुरूवात केल्याने ऐन नवरात्रोत्सवात जनजीवन विस्कळित झाले असून, बाजारपेठा देखील ठप्प झाल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत 49 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा हा वेग 60 किमी प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बंदरांवर स्थानिक सावधानतेचा इशारा देण्यात आलेला असून सर्व मच्छीमार सहकारी सोसायटींना कळविण्यात आले आहे. यावेळी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुरुड परवाना मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी अक्षय साळुंखे यांनी केले आहे.
गेले दोन दिवस तुफानी वाऱ्यांसह पाऊस धो-धो पडत असल्याने दोन दिवसांत मुरूड तालुक्यात 97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 2,526 मिमि पावासाची नोंद झाली असल्याची माहिती मुरूड तहसीलदार कार्यालयातील संदेश वाळंज यांनी दिली आहे. मुरूड-खारअंबोली गावातील शेतकरी मनोज कमाने यांनी सांगितले की, मुरुड शहरासह पंचक्रोशी भागात यंदा शेतीयुक्त पाऊस चांगला पडला असला तरी आता पडणारा पाऊस शेतीला धोका देऊ शकतो. हा पाऊस भाज्यांच्या मळ्यांना व बागायतदारांना नुकसान करु शकतो, अशी प्रतिक्रिया कमाने यांनी दिली आहे.







