रायगड जिल्ह्याचा ९९.७३ टक्के निकाल

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
दहावीत राज्यात ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, रायगड जिल्ह्यातील ९९.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण ३७ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी ३७ हजार ३०१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. यामधील ३७ हजार २०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१६) ऑनलाइन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९९.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यावर्षी प्रथमच करोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे डॉ. किरण पाटील यांनी अभिनंदन केले असून, पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावीनंतर करिअरच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या दृष्टीने पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील शिक्षण घेताना जोमाने अभ्यास करावा व यश मिळवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version