30 सप्टेंबरला होणार लढत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघ आणि पाकिस्तान हॉकी संघ एकाच गटात असणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघाला ग्रुप अ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त जपान, बांगलादेश, सिंगापूर आणि उझबेकिस्तान या संघांचा देखील ग्रुप अ मध्ये समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना हा 30 सप्टेंबरला होणार आहे. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघही ग्रुप अ मध्ये समाविष्ट आहे. या ग्रुपमध्ये कोरिया, मलेशिया, चीन, ओमान, थायलंड आणि इंडोनेशिया या संघाचा समावेश आहे.
हांगझोऊ एशियन गेम्स आयोजक समिती आणि एशियन हॉकी फेडरशेनने आज संयुक्तरित्या हॉकीचे वेळापत्रक घोषित केले. याबाबत बोलताना संघनायक हरमनप्रीत सिंगने सांगितले की, मआमच्या सोबत ग्रुप अ मध्ये काही तगडे संघ देखील आहेत. यात जपानच्या संघाचा देखील समावेश आहे. त्यांनी 2018 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. मात्र आम्ही प्रत्येक संघाला आव्हानात्मक संघच समजणार आहोत. कोणालाही हलक्यात घेणार नाही. तो पुढे म्हणाला, मआशियाई स्पर्धेत आम्ही यातील बऱ्याच संघांसोबत खेळत आहोत. आम्ही हा अनुभव भविष्यात देखील वापरण्याचा आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू.
हॉकीचे सर्व सामने हे हांगझोऊ येथील गाँगशू कनाल स्पोर्ट्स पार्क स्टेडियममध्ये होणार आहेत. हॉकीची पुरूष संघाची फायनल ही 6 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. तर महिला हॉकीची फायनल त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला होणार आहे.