। अलिबाग । प्रतिनिधी ।
अवैधरित्या डिझेलची तस्करी करणार्यांना रायगड पोलिसांनी गजाआड केले. हा छापा रेवस खाडी जवळ पकटी याठिकाणी टाकण्यात आला .त्यांच्याकडून बोटीसह एक कोटी तीन लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुर्वीदेखील रायगड पोलीसांनी कारवाई करीत डिझेल तस्करी करणार्यांना रोखले होते.
खबर्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार रसायनी पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी रेवस येथील पकटीजवळ उभ्या असलेल्या दोन बोटीवर छापा टाकला. या बोटीमध्ये 18 हजार लिटर व 28 हजार अशा एकूण 46 हजार लिटर डिझेलचा साठा आढळून आला. या गुन्हयातील जियाउल्लख असरावली शेख, राजू महतो, कमल बर्मन, पुनित उरा, बिनेय गुरी, पे्रेम महतो यांच्यासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून बोट व डिझेल जप्त केला आहे. रेवस बंदर पर्यटन व जलवाहतुकीच्या दृष्टीने उदयास येत असताना या बंदरालगत पकटीच्या ठिकाणी खाडीजवळ डिझेल तस्करीला उत येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. मांडवा पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बंदरानजीक असे अवैध धंदे सुरु असल्याने मांडवा पोलीसांच्या कामकाजाबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत.