जिल्ह्यात 22 आंदोलने, तीन आत्महन
| रायगड | खास प्रतिनिधी |
मंगळवारी देशात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच आपल्या न्याय हक्कासाठी अन्नाचा पोशिंदाच रस्त्यावर उतरणार आहे. प्रकल्पात गेलेली जमीन परत मिळावी, प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत सामावून घ्यावे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशा विविध मागण्यासाठी रायगडात (दि.15) तब्बल 22 आंदालने करण्यात येणार आहेत. त्यामध्ये तीन आत्मदहन आंदोलनांचा समावेश आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन तब्बल 76 वर्ष झाली आहेत. आजही शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलीत, आदिवासी यांना आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. रायगड जिल्हा हा आधी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. परंतु कालांतराने जिल्ह्यात मोठ्यासंख्येने प्रकल्प उभारण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सातत्याने वाढतच आहेत. त्यांना वर्षानुवर्षे न्यायच मिळत नसल्याने त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. शेतात धान्य पिकवून सर्वांच्या भाकरची सोय करणाऱ्या अन्नाच्या पोशिंद्यावरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सातत्याने सरकार आणि प्रशासन यांच्याकडे पाठ पुरावा करण्यात येतो. मात्र ठोस काहीचमार्ग निघत नसल्याने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी 22 आंदोलने करण्यात येणार आहेत, पैकी 12 आंदोलने ही एकट्या अलिबाग या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहेत. तीन आत्मदहन आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये दीपक लवाटे, गोरखनाथ पारंगे आणि विविक बावधणकर यांचा समावेश आहे. पैकी लवाटे आणि पारंगे यांना प्रशासनाने पत्र देत प्रश्न सोडवण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच अन्य काही आंदोलनांची संख्या देखील कमी होईल असा विश्वास पोलिसांना आहे. आमआदमी पार्टी आणि भिमशक्ती यांंनी देखील आंदोलनाची हाक दिली आहे.