रायगडात शिंदे विरूध्द ठाकरे गट वाद पेटला
| अलिबाग | प्रतिनिधी |
मातोश्रीवर आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या राजा केणी यांनी कंपन्यांमध्ये दलाली करून स्वतःचे खिसे भरले, तसेच कामे न करता बिले काढली. त्यामुळे आपल्या बुडाखाली किती अंधार आहे याचा शोध घ्यावा, असे आव्हान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिले आहे.
डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील नोकरभरती प्रकरणावरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला असून, केणी यांनी केलेल्या आरोपांचा सुरेंद्र म्हात्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पर्दाफाश केला. अलिबाग तालुक्यातील शिंदे गटाकडून सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची लवकरच पोलखोल करणार असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी तालुकाप्रमुख शंकर गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मातोश्रीवर टीका करणाऱ्या राजा केणी यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत सुरेंद्र म्हात्रे म्हणाले, शिंदे गटाचे राजा केणी कंपन्यांमध्ये दलाली करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करीत आहेत. कंपन्यांमध्ये हप्तेखोरी करणाऱ्यांमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. फक्त दलालाची व्यवसाय करणाऱ्यांनाच हे जमते असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. शिंदे गटाचे नेते भस्मासुरासारखे खात चालले आहेत. विकासाच्या कामांपेक्षा एजंट म्हणून काम करीत आहेत. सतत स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणारे ही मंडळी आहेत. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. त्यामुळे मातोश्रीवर बोलणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
अलिबागमध्ये जलजीवन योजनेच्या कामांची काय परिस्थिती आहे. कामे न करता, साहित्य न आणता बिले काढली आहेत. त्यांचा हा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड लवकरच केला जाईल. पुराव्यानिशी त्याची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी जनआंदोलन पुकारले जाणार आहे. अलिबाग, मुरुड तालुक्यात विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आदींच्या माध्यमातून मंजूरी दिली आहे. विकासाचा बाता मारणारे, श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही म्हात्रे यांनी निदर्शनास आणले.
जेएसडब्लू कंपनीत अलिबाग व पेणमधील तरुणांची भरती करून घेण्याची जबाबदारी तत्कालीन जिल्हा प्रमुख तथा विद्यमान आ. महेंद्र दळवी यांच्याकडे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोपविली होती. त्यामुळे पैसे घेतल्याचा संशय महेंद्र दळवी यांच्याकडे जातोय. किती लोक कामाला लागली. किती पैसे घेतले हे आता राजा केणी यांनीच स्पष्ट करावे.
सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे